‘कूर्म पीठ’ (त्रिपुरा सुंदरी शक्तिपीठ) वर बनलेले शक्तिपीठ, कासवं मरण्यापूर्वी घेतात मातेचा आशीर्वाद.
त्रिपुरा सुंदरी शक्तिपीठाचा कासवांशी खूप जवळचा संबंध आहे. हे शक्तिपीठ एखाद्या कासवाच्या पाठीवर असल्यासारखं दिसतं. त्याचबरोबर, जवळच्या कल्याण सागर सरोवरात दुर्मीळ बोस्तामी कासव मोठ्या संख्येने आढळतात. या कासवांना आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे.
‘कूर्म पीठ’ वर बनलेले शक्तिपीठ, कासवं मरण्यापूर्वी घेतात मातेचा आशीर्वाद.
22 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुनर्निर्मित त्रिपुरा सुंदरी मंदिराचे उद्घाटन झाले. 51 शक्तिपीठांपैकी एक असलेले हे देवी त्रिपुरेश्वरीचे मंदिर, आपल्या दिव्यतेसाठी आणि तांत्रिक साधनेसाठी ओळखले जाते. हे मंदिर गोमती जिल्ह्यातील उदयपूर शहरात स्थित आहे आणि याचा कासवांसोबतचा संबंध खूप मनोरंजक आहे. महाराजा धन्य माणिक्य यांनी 1501 साली या मंदिराची स्थापना केली होती. 524 वर्षांपेक्षा जुने असलेले हे मंदिर एका लहान टेकडीच्या माथ्यावर बांधले आहे, जी कासवाच्या पाठीसारखी दिसते. त्यामुळेच, त्रिपुरा सुंदरी मंदिराला ‘कूर्म पीठ’ (कूर्म म्हणजे कासव) म्हणूनही ओळखले जाते. या शक्तिपीठाच्या शेजारीच कल्याण सागर नावाचे तळे आहे. हे मानवनिर्मित तळे दुर्मिळ बोस्तामी कासवांचे निवासस्थान आहे, ज्यामुळे या तळ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. बोस्तामी कासव हा एक विलुप्त होत असलेला जीव मानला जातो, पण त्रिपुरसुंदरी मंदिर (ज्याला उदयपूर माताबाडी असेही म्हणतात) परिसरातील तळ्यात ते सहज दिसतात. ही कासवं आकाराने मोठी असतात आणि अनेकदा गोड्या पाण्याच्या तळ्याच्या किनाऱ्यापर्यंत येतात. शक्तिपीठात येणारे भाविक बोस्तामी कासवांना पाव, बिस्किटे आणि चुरमुरे खाऊ घालतात. हा एक धार्मिक विधी मानला जातो. 2.75 एकरमध्ये पसरलेल्या या तळ्यात मासे पकडणे किंवा कासवांना बाहेर काढणे सक्त मनाई आहे. त्रिपुरसुंदरी मंदिराशेजारी असल्याने कल्याण सागर तळ्यालाही पवित्र मानले जाते. हे ठिकाण श्रद्धा, वारसा आणि जैवविविधता यांच्यातील अनोखा संबंध दर्शवते. कल्याण सागर आणि बोस्तामी कासवांमधील परंपरा आणि एकमेकांवरील अवलंबित्व खरोखर पाहण्यासारखे आहे. स्थानिक मान्यतेनुसार, हे सरपटणारे जीव (कासव) आपल्या मृत्यूआधी त्रिपुरसुंदरी मंदिराच्या पायऱ्यांवर येतात आणि देवीचा आशीर्वाद घेतात.
हिंदू धर्मात श्रद्धा आणि निसर्गाचा गहरा संबंध दिसून येतो. शक्तिपीठातील बोस्तामी कासवांची उपस्थिती आणि लोकांची श्रद्धा एक अनोखा आध्यात्मिक संबंध दर्शवते. भाजपच्या नेतृत्वाखालील त्रिपुरा सरकारने अलिकडच्या वर्षांत या पवित्र कासवांच्या संरक्षणासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. सरकारने जागतिक संवर्धन संस्था ‘टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स’ सोबत मिळून यावर वैज्ञानिक अभ्यासही सुरू केला आहे. या एका वर्षाच्या कार्यक्रमाचा उद्देश कासवांच्या संपूर्ण लोकसंख्येची गणना करणे, त्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन करणे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या संवर्धनाच्या धोरणांची आखणी करणे आहे. कल्याण सागरची पवित्रता जपण्यासाठी भाविकांमध्ये जनजागृती मोहीमही राबवली जात आहे.