११ सप्टेंबर १८९३ : भारतीय संस्कृतीचा दिग्विजयी घोष ! 

११ सप्टेंबर १८९३ : भारतीय संस्कृतीचा दिग्विजयी घोष ! 
तो दिवस होता—
११ सप्टेंबर १८९३!
ज्या क्षणी शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेतून
एक विराट, अमर, आत्मोन्मुख ध्वनी विश्वभर घुमला,
“माझ्या बंधु आणि भगिनींनो!” या साध्या, परंतु दिग्विजयी शब्दांतून हिंदु संस्कृतीचे
अद्वितीय तेज पाश्चात्यांच्या हृदयात उतरले…
तेथे उभा होता—
भगव्या वस्त्रांमध्ये एक तेजोमय संन्यासी,
नेत्रांत दिपणारी उर्जा,
कंठात सिंहगर्जना,
आणि हृदयात अखंड भारताचा अमर आत्मा!
ते होते—स्वामी विवेकानंद!
जगाला त्यांनी भारताचा परिचय करविला,
की भारत हा केवळ दारिद्र्याचा, गुलामगिरीचा
भूभाग नाही,
तर तो आहे—
मानवतेच्या आणि सभ्यतेच्या अखंड मंगलमय
प्रवाहाचे पवित्र तीर्थक्षेत्र
स्वामींच्या प्रत्येक वाक्यातून वाहत होती
अध्यात्माची गंगा,
समानतेची सिंधू,
आणि सार्वभौम बंधुत्वाचा अमर झरा!
त्यांच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द
जणू प्रज्वलित ज्वाला,
जगाच्या हृदयातील अंधकाराचा नाश करणारी.
त्यांचा भावार्थ होता —
“ उदार चरितानां तू वसुधैव कुटुंबकम् ”,
संपूर्ण पृथ्वी म्हणजे एक कुटुंबच,
त्या क्षणी—
भारताची भूमी नव्याने ओळखली गेली.
गुलाम देशातील ही दिव्य ओजस्विता पाहून
पाश्चात्यांनी नम्रतेने माना झुकविल्या.
भारताची संस्कृती ही मागासलेली नाही,
तर मानवतेच्या उन्नतीसाठी
जगाला मार्गदर्शक ठरलेली सर्वश्रेष्ठ परंपरा आहे—
हे शिकागोच्या सभागृहात सिध्द झाले .
स्वामी विवेकानंदांचा तो दिव्य घोष
आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात चेतना
निर्माण करतो.
ते म्हणाले होते
“उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका!”
हाच मंत्र आजही तरूणांना सिंहगर्जनेप्रमाणे आवाहन करतोय्…
आज जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची
भारतीय संस्कृतीच्या उत्थानाची यात्रा
शताब्दी वर्षात पोहोचली आहे,
तेव्हा प्रकर्षानं वाटतं
स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतील त्या दिग्विजयी
घोषणेला
जणू मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे.
स्वामी विवेकानंदांनी रोवलेला भारतीय संस्कृतीच्या दिग्विजयाचा ध्वज
लाखों स्वयंसेवकांच्या परिश्रमातुन, त्यागातुन
अधिक तेजाने आणि मांगल्याने फडकतो आहे
आणि
दिग्विजयाची यात्रा आणखी शंभर पाऊले
पुढे गेली आहे.. .
आज आपण सारे—
स्वामी विवेकानंदांच्या शिकागो दिग्विजय दिनाच्या
स्मरणात उभे असताना
घोष ऐकतो आहोत—
“भारत पुन्हा विश्वगुरु बनेल!”
“भारतमाता पुन्हा जगतगुरू पदी विराजमान
झालेली बघतो आहे” स्वामी विवेकानंदांना
झालेली ही दिव्यदृष्टी
साकार होत असल्याचा विश्वास आज वाढतो आहे. . .
स्वामी विवेकानंदांच्या दिग्विजयी यात्रेचा दीप
भारतभूमी उजळून टाकतो आहे
तो जगालाही प्रकाश दाखविणार आहे. . .
मानवतेचा, कल्याणाचा आणि समृध्दीचाही. . .
“येणारी पन्नास वर्षे भारतमाता हेच
आमचं दैवत असलं पाहिजे” स्वामी विवेकानंदांचा
हा संदेश प्रत्येक भारतवासीयाच्या मनामनात
भिनला पाहीजे…
” भारतमाता की जय” हा मंत्रच सर्व समस्यांवरचं एकमात्र उत्तर आहे.
© निशिकांत,
अकोला
विवेकानंदशिकागोहिंदुधर्म दिग्विजय
Comments (0)
Add Comment