“उठ दोस्ता,उगार मूठ…
शिक्षणाच्या बाजारातील तूच
तुझी थांबव लूट…”
१९९३ चा ७ सप्टेंबर आठवतो का? मुंबई येथे मंत्रालयावर छात्रशक्तीचा विराट मोर्चा… अद्भुत आणि ऐतिहासिक असा हा मोर्चा होता!
बघता बघता त्या ‘प्रचंड’ मोर्चाला आज बत्तीस वर्ष पूर्ण झालेत. एक लाख तीस हजार विद्यार्थी मुंबईच्या रस्त्यांवरून जोशपूर्ण घोषणा देत पण अत्यंत शिस्तीत मंत्रालयावर धडक मारतात, कुठेही गडबड-गोंधळ न करता जोरदारपणे आपल्या मागण्या मांडतात आणि तितक्याच शिस्तीने आपापल्या गावी परततात ही १९९३ सालात घडलेली घटना आहे.
“आरं आरं सरकारची झोप उडाली…
आली आली आली एबीव्हीपी आली…”
या गगनभेदी गीतांनी सगळा महाराष्ट्र हादरला होता आणि आमचे तारुण्य फुलून गेले होते. देशाच्या नव्हे जगाच्या इतिहासात नोंद झालेला हा मोर्चा होता. मुं बईतील समुद्र त्यादिवशी अचंबीत झाला होता असे वर्णन केल्या जात होते. जागतिक विक्रम असलेला हा मोर्चा…
आम्ही सगळे वयाच्या विशी-पंचविशीतच होतो. एकीकडे शिक्षणक्षेत्रात जागोजागी सुरू झालेला व्यापार, विना-अनुदानित महाविद्यालयांतून
चालणारी पिळवणूक आणि दुसरीकडे सरकारी शाळा-महाविद्यालयांची दुर्दशा हे अस्वस्थ करणारे चित्र अत्यंत चिंताजनक होते. अभाविपने शिक्षणक्षेत्रातील या अनागोंदी कारभारा विरोधात एल्गार पूकारला.
महाराष्ट्रातील अक्षरशः गाव न गाव पिंजून काढले गेले. सगळ्या गावांपर्यंत आणि महाविद्यालयांपर्यंत कार्यकर्ते पोहचले. अनेकजण यासाठी विस्तारक निघाले, अनेकजण महिना- महिना प्रवास करीत होते. नियोजनाचे आणि नेतृत्वाचे एक अद्भुत प्रशिक्षणच आमच्या पिढीला मिळत होते. शिक्षणक्षेत्रातील प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करणं, तो विद्यार्थ्यांसमोर मांडणे, दिवसभर संपर्क मोहीम काढणे आणि रात्री भिंती रंगवणे अशा या संघर्षमय ‘काळाने’ आमच्या पिढीला आंदोलनाची आणि नेतृत्वाची दिशा दिली.
एकाही विद्यार्थ्याने विनातिकीट प्रवास करून मोर्चाला यायचे नाही हा परिषदेचा संस्कार आणि दंडकच म्हणा नं ! ज्यांना प्रवासखर्च शक्य नाही अशांसाठी व्यवस्था करणे, प्रवासाचे नियोजन करणे, कोठेही अपघात होणार नाही याची पूर्ण दक्षता घेणे, पोलिसांशी संपर्क ठेवत पालकांनाही भरवसा देणे, मुंबईच्या कार्यालयाशी सतत संपर्क ठेवणे… वयाच्या विशीतच हे सारे शहाणपण आम्ही आत्मविश्वासाने शिकत होतो. घरून आणलेले डबे, एकाच्या डब्यात ऐनवेळेस चार-चार जणांची जेवणे, सायकलचा भरपूर वापर, फोन वगैरे सुविधा जवळपास नाहीतच,पैशांची चणचण नव्हे तर खडखडाटच, एव्हढी मेहनत करूनही वेळापत्रकातील एखादी ‘गोष्ट’ चुकली तरी प्रमुखांकडुन रागवले जायचे, आपापला ‘अभ्यास’ सांभाळून, सांभाळुन कसला दुर्लक्ष करून ‘लष्कराच्या भाकरी’ भाजायच्या आहेत अशी वारंवार मिळणारी तंबी, जीवापाड घाम गाळून संध्याकाळी फुलणारं अकोल्याच्या रतनलाल प्लॉट चौकातील परिषदेचं कार्यालय आणि दिवसभर घडलेले किस्से,कहाण्या आणि मोर्चाला मिळणारा वाढता प्रतिसाद या गप्पांमध्ये हरवत जाणारे भान… सारेच अद्भुत…अवर्णनीय…
७ सप्टेंबर,१९९३ च्या मुंबईत निघालेल्या या ‘विराट’ मोर्चाने महाराष्ट्रातील विद्यार्थी चळवळीला दिली एक सकारात्मक दिशा… गावोगावच्या विद्यार्थ्यांना दाखवला ‘व्यवस्था परिवर्तनाचा’ एक शिस्तबद्ध मार्ग आणि आम्हा कार्यकर्त्यांना दिला अडचणींचे डोंगर फोडणारा ‘तो’ प्रचंड आत्मविश्वास, शिवाय संघर्षातही ‘विधायक’ दृष्टी ठेवण्याचा एक कायमस्वरूपी संस्कार !!
सरकारला हादरवणारं प्रचंड तुफान त्यादिवशी मुंबईत अवतरलं होतं. आम्ही त्या तुफानाच्या अग्रभागी होतो. एवढं प्रचंड तुफान असलं तरी समाजाचं कणभरही नुकसान झालं नाही. लाखो तरूणांना शिस्तीत ठेवणारा तो विलक्षण संस्कार देण्याचं सामर्थ्य फक्त अभाविप मध्येच होतं.
आजच्या परिस्थितीत आंदोलन आणि या मोर्चाची प्रासंगिकता अधिक निर्माण झाली आहे. ‘जोश के साथ होश भी’ ही जाणिव मनात ठासुन निर्माण झाली. मुंबईतील लाखो विद्यार्थ्यांची मंत्रालयासमोर झालेली विराट सभा…
श्रीकांत भारतीय यांचे सुत्रसंचालन, राजकुमारजी भाटीया, चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे आणि कित्येकांची भाषणे आजही डोळयांपूढे उभी राहतात. आशिष शेलार, राजेश पांडे, आदी अनेक तत्कालीन कार्यकर्ते मोर्चाची संपूर्ण व्यवस्था बघत होते. प्रमोदजी, गोपीनाथजी आदी अनेक नेते प्रेक्षकांमध्ये समोरच्या रांगेत बसलेले होते.
या ऐतिहासिक आंदोलनाच्या यज्ञात आमच्या पिढीने आपल्या परिश्रमांच्या आहुती टाकलेल्या आहेत… याचा आनंद आहे, समाधान आहे. या निर्मळ, निर्मोही आनंदाचे आज स्मरण करू या…स्मरण… तेजाचे, उर्जेचे, योग्य मार्गाचे… संस्कारांचे, स्नेहाचे, आपलेपणाचे, संघटनेचे आणि शक्तीच्या उपासनेचे!
© निशीकांत,
अकोला.
(संदर्भ: ‘अभाविप विराट मोर्चा’ फेसबुक पोस्ट.)