भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री मानली जाते. भारतात दरवर्षी शेकडो चित्रपट प्रदर्शित होत असतात. या प्रचंड यंत्रणेला चालना देणारी मूळ शक्ती म्हणजे वित्तीय पाठबळ. मात्र हा पैसा कायम स्वच्छ स्रोतांतून येत राहिला आहे का, की त्यामागे अंडरवर्ल्डचे विघातक हात देखील होते?
प्रारंभीचा काळ : कलात्मक ध्येय आणि त्याग
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया उभारताना कलात्मकतेला आणि त्यागाला मोठे स्थान होते. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारताचा पहिला चित्रपट बनवला. या निर्मितीसाठी त्यांनी घरातील दागदागिने गहाण ठेवून प्रचंड वैयक्तिक त्याग केला होता. पुढे प्रभात फिल्म्स, बॉम्बे टॉकीज, आर.के. स्टुडिओ यांसारख्या स्टुडिओ संस्कृतीतून निर्मिती आणि वितरण दोन्हींचे भक्कम जाळे उभे राहिले. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, बाबुराव पेंटर यांच्यासारखे दिग्दर्शकांनी कलात्मक, प्रयोगशील चित्रपट निर्मिती करून सामाजिक संदेशप्रधान चित्रपट घडवण्याची जबाबदारी त्यांनी उचलली. त्यामुळे त्या काळातील सिनेमाला व्यावसायिक गणितापेक्षा कलात्मक ध्येय, सामाजिक आशय आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा संदेश अधिक महत्त्वाचा वाटत असे.
७०–९० चे दशक : अंडरवर्ल्डचा पैसा आणि नरेटीव्स
सत्तरच्या दशकापासून मुंबईच्या अंडरवर्ल्डने बॉलिवूडमध्ये थेट प्रवेश केला. हाजी मस्तान, करीम लाला आणि दाऊद इब्राहिम यांसारख्या गुंडांनी चित्रपट निर्मितीमध्ये गुंतवणूक सुरू केली. त्या काळात लेखक जोडी सलीम-जावेदने दीवार आणि डॉन सारखे सुपरहिट चित्रपट दिले. या कथानकांत ७८६ नंबरचा ताबीज, रहीम चाचा यांसारखी इस्लामिक प्रतीके वारंवार अधोरेखित झाल्याचे जाणवले.
याच काळात अभिनेता संजय दत्तच्या AK-56 रायफल प्रकरणामुळे अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडमधील संबंध प्रत्यक्षात उघडकीस आले. पुढे वास्तव सारख्या चित्रपटांत छोटा राजनसारख्या गुंडांच्या जीवनावर आधारित कथा पडद्यावर येऊ लागल्या. अगदी अभिनेत्री प्रीती झिंटानेही उघड केले की चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटाच्या निर्मितीसाठी छोटा शकीलचा पैसा वापरला गेला होता. त्यामुळे आर्थिक गुंतवणूकीसोबतच कथानकांची दिशा व सिनेमातील नरेटीव्स घडवण्यातही अंडरवर्ल्डचा हात असल्याचे स्पष्ट झाले.
२००० नंतर : कॉर्पोरेट वित्त, पण अजेंडा कायम
२००० नंतर बॉलिवूडमध्ये कॉर्पोरेट घराण्यांनी प्रवेश केला. Reliance Entertainment, UTV, Viacom 18, Dharma Productions आणि Yash Raj Films यांसारख्या कंपन्यांनी शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याच काळात Disney, Sony, Fox यांसारख्या हॉलिवूड स्टुडिओनीही भारतीय बाजारपेठेत पाय रोवले. यामुळे तांत्रिक दर्जा वाढला, मल्टिप्लेक्स संस्कृती स्थिरावली आणि आंतरराष्ट्रीय वितरणाला चालना मिळाली.
आर्थिक रचना बदलली तरी कथानकातील अजेंडा कायम राहिल्याचे दिसते. ओ माय गॉड (२०१२) आणि पीके (२०१४) या चित्रपटांत हिंदू श्रद्धांवर प्रश्न उपस्थित करताना इतर धर्मांबाबत मात्र मौन राखले गेले. यशराज फिल्म्सच्या “स्पाय युनिव्हर्स”मध्ये पठाण, टायगर, कबीर यांसारखी व्यक्तिरेखेची नावे ठळकपणे दिली गेली आणि त्यातून एक प्रकारचा “छद्म-धर्मनिरपेक्ष” (Pseudo Secularism) पॅटर्न प्रेक्षकांसमोर आला.
बॉलीवूडने गेल्या अनेक दशकांत काय केले, हे आता लपून राहिलेले नाही. उदा. अंडरवर्ल्डचा पैसा, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ठराविक पंथाचे उदात्तीकरण, हिंदू श्रद्धांचा उपहास आणि हिंसाचाराला “स्टाइल” बनवणे इत्यादी. पीकेसारख्या चित्रपटांमधून श्रद्धांची निवडक चिकित्सा केली गेली, गँगस्टर ड्रामा मध्ये गुंडांना नायक ठरवले गेले आणि “७८६” सारखी प्रतीके गौरवली गेली. आज हीच पद्धत दक्षिणेकडे झिरपू लागली आहे.
कथा, संस्कृती दर्शन आणि प्रामाणिकपणातून प्रेक्षकांना जिंकून घेणे हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे वैशिष्ट्य हे आहे. पण जर तोच सिनेमा आता बॉलीवूडच्या गलिच्छ मार्गावर उतरला, तर दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीही बॉलीवूडची प्रतिकृती म्हणून ओळखली जाईल. आणि मग उरेल ती केवळ चमकधमक, अर्धसत्य असेलेले अजेंडे आणि संस्कृतीवरचा प्रहार.
बॉलीवूडमधील वित्तपुरवठा
| दशक | वित्तीय स्रोत | वैशिष्ट्ये |
|---|---|---|
| 1910–1960 | स्वतःची संपत्ती, व्यापारी, स्टुडिओ | कलात्मक ध्येय, सामाजिक आशय |
| 1970–1990 | अंडरवर्ल्ड, वितरक | काळा पैसा, कथानकावर नियंत्रण |
| 2000–2010 | कॉर्पोरेट हाऊस, बँका | व्यावसायिकरण, जागतिक गुंतवणूक |
| 2010 नंतर | हॉलिवूड स्टुडिओ, OTT | डिजिटल वितरण, अजेंडा पेरणी कायम |
सिनेमातील प्रतीकांमधून छुपा संदेश रुजवण्याचा प्रयत्न
| चित्रपट | प्रतीके आणि छुपा संदेश |
|---|---|
| दीवार (1975) | ७८६ तावीज, रहीम चाचा – मुस्लिम उदात्तीकरण |
| डॉन (1978) | गुन्हेगारीचे ग्लॅमर, अंडरवर्ल्ड प्रेरणा |
| वास्तव (1999) | छोटा राजनच्या जीवनावर आधारित कथा |
| चोरी चोरी चुपके चुपके (2001) | छोटा शकीलने केलेला वित्तपुरवठा |
| PK (2014) | हिंदू देवतांचा अपमान, निवडक धार्मिक श्रद्धांची वरवरची चिकित्सा |
| पठाण (2023) | नायकाचे नाव ‘पठाण’ – छद्म-धर्मनिरपेक्ष अजेंडा |
सोर्स ..