ब्रिटनच्या एफ ३५ विमानामागील वास्तव.
ब्रिटनची नौसेना हिंद महासागरात युद्धाभ्यास करत असतांना एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स या विमानवाहू जहाजावरील ११० मिलियन डॉलर्स किंमतीच एक एफ ३५ बी लाइटनिंग २ याअत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमान,कमी इंधन पातळी आणि प्रतिकूल हवामानामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत,भारताकडे वळवाव लागून केरळमधील तिरुवनंतपुरमच्या लष्करी विमानतळावर उतरल. इथे उतरल्यावर त्याच्यामधे काही अजून दोष आढळून आल्यामुळे ते परत जाऊ शकल नाही. त्याच्या दुरुस्तीसाठी प्रिन्स ऑफ वेल्सचे तंत्रज्ञ अनेकदा हेलिकॉप्टरनी तिरुवनंतपुरमला आलेत पण विमान दुरुस्त झाल नाही.आता वैमानिकही परत गेला आहे.३० जूनला प्रिन्स ऑफ वेल्स आणि इतर युद्ध नौका,उर्वरित ११ एफ ३५ विमानांसमेत,दुसऱ्या युद्धाभ्यासासाठी सिंगापूरला रवाना झालेत.
ते विमान मात्र अजूनही तेथेच धावपट्टीच्या “बे ४”या एका निर्जन एकांत भागात (सेकल्युडेड एरिया) उभे आहे. भारतीय वायुसेनेची अवास्तव तारीफ करणाऱ्या, ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची गुड्डी कशी वर झाली याच सुरस वर्णन करणाऱ्या, भारतीय तंत्रज्ञानांसमोर पाश्चात्य देशांनी कशी नांगी टाकली आणि अमेरिका/ब्रिटन/नाटोची खिल्ली उडवत या विमानाच्या वास्तवाबद्दल संपूर्णत: दिशाभूल करणाऱ्या अनेक पोस्ट्स सोशल मीडियावर फिरत आहेत/होत्या. यात प्रामुख्यानी; भारताने अमेरिकन एफ ३५ लढाऊ विमानाची रडार सिस्टीम भारतानी कशी जॅम केली, भारतीय वायुसेनेनी/ तिरुवनंतपुरम एयर ट्रॅफिक कंट्रोलरनी त्या विमानाची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा एका पावरफुल जॅमरचा वापर करून खराब केली, ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे स्तिमित झालेल्या पाश्चात्य राष्ट्रांनी,पाकिस्तानमधील अमेरिकन/चीनी लढाऊ विमान आणि क्षेपणास्त्रांवर मात करणारी कोणती रडार सिस्टीम भारताकडे आहे, पाकिस्तानच्या आत घुसून तेथील संसाधनांना बरबाद करणाऱ्या भारतीय क्षेपणास्त्र/ड्रोन्सनी अमेरिकन/चीनी क्षेपणास्त्र/ विमान/ड्रोनविरोधी संरक्षण प्रणाल्यांना कसा चकमा दिला, भारताच्या रडार प्रणाली कशा काम करतात हे चेक करण्यासाठी अमेरिकेच्या सांगण्यावरून ब्रिटननी हे विमान भारताच्या हवाई हद्दीत पाठवल; इत्यादि गोष्टी आल्या आहेत. या मागील वास्तव वेगळच आहे.
हे एफ ३५ विमान प्रिन्स ऑफ वेल्स या विमानवाहू नौकेच्या ताफ्यातल आहे. या युद्धनौका युद्धाभ्यास करत असतांना, या विमानानी युद्ध सरावासाठी काही सामारिक उड्डाण (ऑपरेशनल सॉर्टिज) केलीत. शेवटल्या उड्डाणानंतर या विमानानी प्रिन्स ऑफ वेल्सच्या डेक वर उतरण्याचा प्रयत्न केला. विमान डेकवर उतरतांना त्याची लँडिंग गेअर्स आणि अरेस्टर हुक खाली येतो.अरेस्टर हुक डेकवरील अरेस्टर वायरमधे अडकण आणि लँडिंग गेअर्स डेकला टच करण एकत्र होण अत्यावश्यक असत नाही तर विमान जंप करण्याची/ उलट होण्याची संभावना/भीती असते. पण विमान अस उतरतांना वैमानिक आणि डेक क्रूच्या लक्षात आल की विमानाच्या लँडिंग गेअर्स आणि अरेस्टर हुकची हायड्रॉलिक यंत्रणा काही कारणास्तव खराब झाल्यामुळे विमान डेकवर उतरतांना त्याची गती कमी करून त्याला अगदी कमी अंतरावर रोखण्यासाठी डेकवर जी अरेस्टर वायर लावली असते ती, आणि विमानाच्या अरेस्टर हुकचा समन्वय (सिंक्रोनायझेशन) होत नाहीय. या समन्वयाच्या अभावी हे विमान डेकवर उतरण्यात पूर्णतः असमर्थ होत (अनफिट फॉर डेक लँडिंग).डेक वर उतरण्याचे चार अयशस्वी प्रयत्न झाल्यावर वैमानिकाच्या लक्षात आल की जास्त वेळ घालवला तर विमानातील इंधन संपून विमान डेकवर किंवा समुद्रात पडेल. अशा वेळी वैमानिक इजेक्ट करू शकत नाही कारण मिनिमम हाईट फॉर इजेक्शन नसते आणि वर जाऊन इजेक्ट केलं तर विमान समुद्रात क्रॅश होत. आणि हे कोणालाच मंजूर नव्हत. म्हणून विमानाला जवळच्या विमानतळावर लॅन्ड करण्यासाठी पाठवण्यात आल. युद्धाभ्यास केरळ किनाऱ्यापासून केवळ १५० नॉटिकल मैल अंतरावर सुरू होता तेथून सर्वात नजीक भारताची हद्द असल्यामुळे भारताशी संपर्क साधण्यात आला. भारतानेही मोठ्या मनाने त्या विमानाला भारतात उतरण्याची परवानगी दिली. भारतीय वायुसेनेच्या एकात्मिक हवाई कमांड अँड कंट्रोल सिस्टिमनी तिरुवनंतपुरमला लँडिंगचा समन्वय साधला. इंधन भरल्यावर हायड्रॉलिक सिस्टीममधे बिघाड आढळून आला. एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सच्या रॉयल नेव्ही तंत्रज्ञांनी विमानातील बिघाड दुरुस्त करण्याचा असफल प्रयत्न केला.कोणतही उपर लढाऊ विमान आपल्या हद्दीत आल्यास त्याला लढाऊ विमान एस्कॉर्ट करतात.तदनुसार; तिरुवनंतपुरम एयर बेसमधील दोन सुखोई ३० विमानांनी या विमानाला एस्कॉर्ट करून विमानतळावर उतरवल.हे दुसऱ्या देशाच लढाऊ विमान असल्यामुळे त्याला विमानतळावरील दूरच्या निर्जन ठिकाणी नेण्यात आल.हे अती प्रगत विमान असल्यामुळे वैमानिक सुरवातीचे दोन दिवस विमानाजवळच थांबला होता.नंतर तो,भारतीय वायुसेनेच्या मेसमधे शिफ्ट झाला.
संरक्षणतज्ञ या वर; “हायड्रॉलिक फेल्युअर, फ्लाय बाय वायर सिस्टीम फेल्युअर,क्रिटिकल सिस्टीम जॅमिंग,लो ऑन फ्युएल,सॉफ्ट वेयर फेल्युअर किंवा अवर स्टडी ऑफ एअरक्राफ्ट ॲझ इट हॅज एंटर्ड अवर एअरस्पेस विदाउट वॉर्निंग/परमिशन/ फाइंडिंग अवर इन्फॉर्मेशन”या धर्तीवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देताहेत.पण यात खरोखर कोणता दोष आहे हे ब्रिटननी आधिकारिक रित्या जाहीर केल्या शिवाय अधिकृत होणार नाही. सूत्रांनुसार, “सॉफ्ट वेयर रिलायएबिलिटी इश्यु” अंतर्गत,विविध देशांमधील काही एफ ३५ विमानांना अनेकदा “ग्राउंड” करण्यात आल होत कारण,यंत्र प्रणाली जितकी अत्याधुनिक (सोफिस्टिकेटेड) असेल तितकीच ती खराब झाल्यास दुरुस्त करण अवघड असत.अस म्हणतात की एफ ३५ विमानामधील रडार्स आणि क्षेपणास्त्र,८ ते १२ गिगाहाट्झ किंवा त्यावरच्या एक्स बॅण्डवर काम करतात आणि त्यामुळे एक किंवा दोन गिगाहाट्झ किंवा त्याहीपेक्षा कमी एल बॅण्डवर काम करणारे रडार्स त्यांना सहजरित्या पकडू शकतात. मात्र आपल्या येथील वृत्तपत्र,टीव्ही आणि सोशल मीडियावर; आपली रडार यंत्रणा,जॅमर, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डॅमेज, ऑपरेशन सिंदूर, आपल इलेक्ट्रॉनिक वर्चस्व इत्यादि वैगेरे नको त्या अफवांच पेव फुटल.यातून लोकांना काय समाधान मिळत तेच जाणे.वास्तव मात्र वेगळच आहे.या एफ ३५ विमानाची अरेस्टर हुक यंत्रणा आणि चालकांची (अंडर कॅरेज) हायड्रॉलिक यंत्रणा दुरुस्त (रिपेअर( होत नाही तो पर्यंत हे जहाज कोणत्याही विमानवाहू जहाजावर उतरू शकत नाही.सुरवातीला काही प्रिन्स ऑफ वेल्सच्या टेक्निशियननी येऊन विमानाच्या दोषांना रिपेअर करण्याचा प्रयत्न केला.पण काही कारणास्तव या विमानातील हे मेकॅनिकल पार्टस “बियाँड रिपेअर डॅमेज” झाले असल्यामुळे ते बदलण्या खेरीज दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे ते, हे पार्ट्स अमेरिकेतून येण्याची वाट पाहताहेत. ही पुरवठा यंत्रणा किचकट आहे.ब्रिटन अमेरिकेकडे मागणी करेल.अमेरिका हे का व कस झाल याची तहकिकात करेल.योग्य उत्तर मिळाल्यावर ते मागितलेले पार्ट्स ब्रिटनला देतील.ब्रिटन ते भारतात पाठवेल आणि मग विमानाची दुरुस्ती करण्यात येईल. विमान रोडवर्दी झाल की त्याच्या अनेक टेस्ट्स हॉटेल.त्या समाधानकारक झाल्यास हे विमान परत प्रिन्स ऑफ वेल्स वर रवाना होईल. आता हे पार्ट्स येई पर्यंत हे विमान तिरुवनंतपुरम येथील वायुसेनेच्या हँगर्समधे ठेवण्याची विनंती ब्रिटननी भारत सरकारकडे केली आहे.सद्यःस्थितीत विमान हँगरमधे नेऊन त्यातील हायड्रॉलिक बिघाडाच निराकरण करण्यासाठी एक विशेष टो व्हेईकल आणि ४० ब्रिटिश अभियंते विशेष विमानानी भारतात येत आहेत.
सूत्रांनुसार,जर ब्रिटनहून पार्ट्स आल्यानंतर ही जर हे विमान दुरुस्त झाल नाही तर ब्रिटन आपल अजस्त्र,सी १७ ग्लोब मास्टर किंवा तत्सम हेवी लिफ्ट ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट पाठवून त्याला ब्रिटनमधे घेऊन जाईल. सध्यातरी ब्रिटन या विमानाची निगराणी त्याच्या उपग्रहाच्या माध्यमातून करतो आहे.दुरुस्त झाल्यावर,त्याला “फ्लाय वर्दी” सिद्ध करण्यासाठी बरेच प्रयत्न आणि चाचण्या कराव्या लागतील हे निश्चित आहे. भारतामधील विमानवाहू युद्धनौकांपैकी आयएनएस विक्रमादित्य वर सध्या मिग २९ केच समुद्री व्हर्षन कार्यरत आहे आणि विक्रांतवर २०२६ नंतर रॅफेल लढाऊ विमानांची समुद्री व्हर्षन असतील. त्यांच्यातही या प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात.करण पहिल रशियाच आणि दुसर फ्रान्सच विमान आहे.अमेरिकेनी जी वागणूक ब्रिटनला दिली तशीच या दोघांनी भारताला देण्याचा विचार केल्यास/दिल्यास आपण त्यासाठी तयार असल पाहिजे.खास करून ज्या वेळी तेजसच समुद्री व्हर्षन नैसेनेत दाखल होईल.भारत यासाठी सिद्ध असेल यात संशयच नाही.
०१/७/२५:१६, भगवाघर कॉलनी, धरमपेठ, नागपूर,१०:९४२२१४९८७६/अबमुप्क४@gmail.com.