देशाचा राजा कायम पण तणावात ?

भेंडवळच्या घटमांडणीतून संकेत.

बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पारंपरिक घटमांडणीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे ३७० वर्षांची परंपरा लाभलेल्या या  विशेष महत्व आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काल सूर्यास्ताच्या वेळी घट मांडण्यात आला, तर आज पहाटे सूर्योदयावेळी सूक्ष्म निरीक्षण करून वर्षभरातील पाऊस, पीकस्थिती, अर्थकारण, राजकारण आणि देशाच्या सुरक्षेविषयी अंदाज जाहीर करण्यात आले.

म्हणजेच पंतप्रधान पदावर बदल होणार नसला तरी सत्ताधाऱ्यांवर तणाव वाढलेला राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर ताण वाढेल आणि सुरक्षा परिस्थिती काहीशी कमकुवत राहू शकते, असे देखील संकेत या भाकितांतून देण्यात आले आहेत. आर्थिक आघाडीवर देशाला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे चित्र देखील समोर आले आहे. शेतीच्या दृष्टीने पाहता, यंदा शेतकऱ्यांसाठी वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विविध पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढेल, असा अंदाज आहे.

मात्र काही पिकांसाठी परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी या पिकांचे उत्पादन चांगले होईल आणि त्यांना बाजारात योग्य भाव देखील मिळेल, असे भाकीत करण्यात आले आहे. ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण पातळीवर राहतील, असे देखील सांगण्यात आले. पावसाच्या दृष्टीने जून महिन्यात चांगला पाऊस पडेल, जुलै महिन्यात तो सर्वसाधारण राहील, तर ऑगस्ट आणि सप्टेम्बबारमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे महापुराचा धोका निर्माण होऊन नुकसान होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यंदाच्या गट मांडणीतून निघालेले प्रमुख निष्कर्ष-

  • पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल.
  • कापूस, तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर.
  • ज्वारी , तूर, मुंग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील.
  • तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल.
  • देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल 
  • राजा कायम असेल…
  • देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही.
  • पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट, सप्टेंबर कमी असेल…
  • अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार.

काय आहे भेंडवळ भविष्यवाणी ? 

पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जात आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती, आणि आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत. 

घटमांडणी नेमकी कशी करतात ? 

भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात. घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्ये मांडली जातात.

अंदाज आणि भाकिते  कशावरून व्यक्त केली जातात ?  

घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येते. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतुट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पिकपाण्याचे नियोजन करत असतात. मातीच्या ढेकळावरून चार महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिके कसे राहतील, हे सांगण्यात येते. चारा-पाणीसाठी सांडाई, कुरडई, तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते. करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भादली हे रोगराईचे, तर पान-विडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. राजा म्हणजे पंतप्रधान. पान, विड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक आहे.

शेतकरी यावर विश्वास का ठेवतात आणि शेतकऱ्यांसाठी भाकीत महत्त्वाचे का ?  

घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह अनेक भागातून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात, या परिसरात हजारोंच्या संख्येने शेतकरी एकत्रित जमतात. शेतकरीच नव्हे तर बी-बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही शेतकऱ्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी येथे गर्दी करतात. शेतकरी वर्ग घटमांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, हे ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.

घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का ?  

घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.   Photo Google – Sorce..

 

Bhendawal Ghat Mandani - ShetarakiParampara
Comments (0)
Add Comment