निवृत्त पोलीस महासंचालक – प्रवीण दीक्षित यांचा विशेष लेख.

समाजाच्या संमतीने व सहकार्याने समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी आणि समाजस्वास्थ्य कायम ठेवण्यासाठी लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी बनवलेल्या घटनेने पोलीस दलाची निर्मिती करण्यात आली आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रजांनी भारतातील त्यांची सत्ता कायम राखण्यासाठी व त्यांच्या सत्तेला विरोध करणार्‍यांना चिरडून टाकण्यासाठी भारतातील संस्थाने विलीन केली. १८५७च्या स्वातंत्र्यसमरानंतर पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली भारतातील सध्याच्या पोलीस दलाची मुंबई, कलकत्ता, मद्रास व अन्य प्रांतांत निर्मिती करण्यात आली. १९२२पर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी हे पद फक्त इंग्रज अधिकार्‍यांसाठी राखीव होते. त्यामुळे खालच्या पदांवर म्हणजे शिपाई, फौजदार, पोलीस निरीक्षक, पोलीस उपअधीक्षक या पदांवर फक्त भारतीय काम करत होते. इंग्रजांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक लोकांचे दमन करणारे, स्वातंत्र्यसेनानींना त्रास देणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाई. तरीही त्या वेळी असलेल्या बेकारीमुळे, गरिबीमुळे व संस्थाने खालसा झाल्यामुळे अनेक गरीब ब्राह्मण घरांतील होतकरू मुले पोलीस दलात काम करू लागली.

भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या १८व्या अध्यायात ४२व्या श्लोकात ब्राह्मण्याची व्याख्या अशी केली आहे –

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च।

ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्।। अर्थात् शम (निग्रह), दम (बाह्य इंद्रियांचा निग्रह), तप (बाह्य व आंतर), शुद्धी, क्षमा, आर्जव (सरळपणा), शास्त्रज्ञान, विज्ञान (शास्त्रार्थााची अनुभूती) व आस्तिक्य (शास्त्रादिकांविषयी श्रद्धा) हे ब्राह्मणाचे स्वभावसिद्ध कर्म आहे.

कामसू वृत्ती, लेखनात हुशार, प्रामाणिकता, कामावरील श्रद्धा, स्वामीनिष्ठा, मृदुपणा, सर्व नियमांची-कामकाजाची उत्तम माहिती, जनसंपर्क व भ्रष्टाचारापासून अलिप्त या त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गुणांमुळे त्यांनी पोलीस ठाण्यातील महत्त्वाच्या अशा लेखनिक, मुद्देमाल कारकून, कोर्ट कारकून अशा अनेक पदांवर आपली छाप निर्माण केली. कुठेही बदली झाल्यास आज्ञाधारकपणे त्वरित तिथे पोहोचणे व लगेचच कामाला सुरुवात करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. निःपक्षपातीपणामुळे व स्थानिक लोकांच्या सहकार्याने अनेक गुन्ह्यांचा तपास त्यांनी हुशारीने केला आणि वेळोवेळी लोकांची व वरिष्ठांची मर्जी त्यांनी संपादन केली.

१९व्या शतकात, गणेश सहस्रबुद्धे यांना एकदा एका इंग्रज अधिकार्‍याने त्या वेळच्या नगर जिल्ह्यामध्ये पाहिले व विचारले, ‘तू पोलिसांत भरती होतोस का?’ त्याप्रमाणे ते पोलीस दलात बरीच वर्षे काम करत होते. पुढे साईबाबांनी त्यांना सांगितले, ‘तू ही नोकरी सोड;’ ‘पण चरितार्थ कसा चालवणार?’ त्यावर साइबाबांनी सागितले, ‘तू संतचरित्रे लिही व ती लोकांना सांग.’ त्याप्रमाणे सुरुवात होऊन आधुनिक महिपती म्हणून प्रसिद्ध दासगणू महाराजांचा लोकांना परिचय झाला हे सर्वश्रुत आहे.

भारतीय घटनेप्रमाणे भारत अनेक राज्यांमधे विभागलेला आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्या राज्यांवर सोपवलेली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असणारे पोलीस, गुप्तवार्ता संस्था (उदा. आयबी, रॉ, सीबीआय, बीएसफ, सीआरपी, एसएसबी, एनआयए, आयटीबीपी) अशी अनेक दले केंद्र शासनाच्या अखत्यारीत काम करत असतात. त्यांमध्ये ५० लाखांहून अधिक अधिकारी-कर्मचारी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यात पुरुषांबरोबर स्त्रियांचीही मोठ्या प्रमाणात निवड केली जाते. परंतु माहीत नसल्यामुळे किंवा उदासीनतेमुळे किंवा आत्मविश्वासाअभावी महाराष्ट्रातील ब्राह्मण मुले-मुली या केंद्रीय दलांमध्ये अधिकारी किंवा कर्मचारी पदांवर क्वचितच आढळतात. दर वर्षी जवळजवळ चार लाख तरुण स्त्री-पुरुषांची या ठिकाणी गरज असते. वेतन अंदाजे दरमहा एक लाख रुपये असते आणि सोबत अनेक सुविधाही असतात. त्यासाठी दर वर्षी नियमितपणे स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्याची तयारी करून ब्राह्मण मुला-मुलींनी त्याचा फायदा घेतल्यास त्यांचे, कुटुंबीयांचे व देशाचे कल्याण होईल.

या अनेक संधी उपलब्ध आहेत, प्रत्यक्ष तसेच आंतरजालाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार्‍या ‘अमृत’सारख्या संस्था आहेत, मुंबईच्या सावरकर राष्ट्रीय स्मारक निधीत मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था आहे, शिष्यवृत्त्या आहेत. त्यामुळे होतकरू तरुण-तरुणींनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे सुचवावेसे वाटते. या संधीपासून दूर राहण्याने आपण आपले नुकसान तर करतोच; पण देश विकासामध्ये आपल्या योगदानाने इतरांना विकसित व्हायला जी मदत झाली असती ती आपण नाकारत असतो.

देश एकसंध ठेवणे, परकीय शक्तींच्या आक्रमणाच्या वेळेस अंतर्गत सुरक्षा कायम राखणे, विविध राजकीय पक्षांच्या स्पर्धेत लोकांचा योग्य उमेदवार निवडायचा हक्क बजावायला मदत करणे व अडथळा आणणार्‍यांना प्रतिबंध करणे, विविध आंदोलनांत नागरिकांचे जीवन व मालमत्तेचे रक्षण करणे, सायबर क्राइम्स आणि आर्थिक गुन्ह्यांत लोकांची फसवणूक होणार नाही यासाठी प्रयत्न करणे व झाल्यास त्यांची रक्कम त्यांना परत करण्यास मदत करणे, महत्त्वाच्या व्यक्तींचे रक्षण करणे, औद्योगिक सुरक्षा अशी एकाहून एक अवघड वाटणारी कामे यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी भारतीय पोलीस सेवेत निवड झालेल्या अधिकार्‍यांना पार पाडावी लागते. वर उल्लेख केलेल्या अनेक संस्थांमध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्रातील व अन्य राज्यांतील ब्राह्मण अधिकार्‍यांनी सतत फार मोठे योगदान केलेले आहे. व्ही. जी. गोखले हे माउंट अबू येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक होते. व्ही. जी. वैद्य इंटेलिजन्स ब्यूरोचे संचालक होते. मोहन कात्रे सीबीआयचे प्रमुख होते. मी (प्रवीण दीक्षित) देशातील ‘इमिग्रेशन’चा प्रमुख होतो. दत्ता पडसलगीकर राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार होते. सदानंद दाते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख होते आणि सध्या ते पोलीस महासंचालक असून, त्यांचे उत्कृष्ट योगदान आहे. ही मी फार थोडी नावे नमूद केली आहेत. संपूर्ण यादी लिहायची झाली, तर पाने कमी पडतील. महाराष्ट्र व मुंबईबद्दल सांगायचे तर एस. के. बापट, भावे, सोमण हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. पोलीस महासंचालक म्हणून मी २०१५-१६मध्ये काम पाहिले.

लोकांना भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करणे सोपे व्हावे म्हणून एसीबी महाराष्ट्र हे अ‍ॅप आम्ही तयार केले होते. त्यामुळे कोणीही व्हिडिओ, ऑडिओ किंवा फाइल मेसेज सहजपणे संबंधित अधिकार्‍याला पाठवू शकले. त्यामुळे दोन वर्षांत २४०० लाचखोर अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडणे शक्य झाले. पोलीस महासंचालक असताना गडचिरोली, गोंदिया भागातील नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या उपायांमुळे स्थानिक जनतेने नक्षल्यांना पूर्णपणे झिडकारले व नवीन भरती बंद झाली. पोलिसांच्या होणाऱ्या हत्या योग्य प्रशिक्षणामुळे बंद झाल्या. जनता व पोलीस यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस मित्र ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली. संपूर्ण राज्यातून पाच लाख स्त्री-पुरुष आपखुशीने पुढे आले व पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम कोणताही मोबदला न घेता करत होते. सर्व सणांमध्ये बंदोबस्त करत होते. त्यामुळे चेन स्नॅचिंग, खंडणी, लुटालूट करणे अशा रस्त्यावरील गुन्ह्यांमध्ये १५-२० टक्के घट करण्यात यश आले. मी नागपूरमध्ये आयुक्त असताना, गुन्हेगारीत अडकलेल्या १८ वर्षांखालील मुलांसाठी समुपदेशन करून त्यांना व्यवसायकौशल्य देण्यात आले. त्यामुळे ते कमावू लागले व घरच्यांना आर्थिक मदत करू लागले. पोलिसांच्या कल्याणासाठी मुंबई व अन्य भागांत चांगली घरे बांधून दिल्याने पोलिसांचे मनोधैर्य उंचावले. पोलिसांच्या मुलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

मुस्लिम तरुणांची डोकी भडकवून त्यांना आततायी करण्याच्या प्रयत्नांविरोधात अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दहशतवादविरोधी पथकात काम करत असताना अत्यंत महत्त्वाचे काम केले. अनेक दहशतवादी कोणतेही देशविरोधी कृत्य करण्यापूर्वी पकडले गेले. राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) विशेष संचालक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक दहशतवादी मोड्यूल्स उद्ध्वस्त केली. सोलापूर ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पंढरीच्या वारीत येणार्‍या २० लाख वारकर्‍यांची अचूक मोजणी केली. चेनस्नॅचिंग करणार्‍या गुन्हेगारांना फेशियल टेक्नॉलॉजीचा वापर करून पकडले. याव्यतिरिक्त त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारात झाडे लावून हवामान थंड राखण्यास हातभार लावला आहे.

मी पोलीस सेवेत रुजू झालो तेव्हा बॅनर्जी पोलीस अधीक्षक होते. मुख्यालयातून त्यांनी मला एक सायकल दिली व सांगितले, की ‘ही तू वापरत जा.’ तेव्हा ब्राह्मण अधिकारी अतिशय साधेपणे जगत होते. आजही जिथे सायकल पॅट्रोलिंग केले जाते, तिथे गुन्हे कमी होतात. त्यानंतर आलेल्या अरविंद इनामदार यांच्याकडून पोलिसिंगबद्दल मला खूप काही शिकता आले. संभाजीनगरमध्ये काम करत असताना पोलिस निरीक्षक कुलकर्णी यांनी पेठांमधून, बाजारातून पायी पॅट्रोलिंग करण्याचे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे कसब शिकवले. पोलिसिंगमध्ये हडेलहप्पी नसून, ते शांतपणे, कौशल्याने, मेहनतीने करायचे काम आहे, हे अनेक ब्राह्मण अधिकार्‍यांनी समाजावर आपल्या उत्कृष्ट वर्तनाने वारंवार बिंबवले आहे. त्यामुळे मी सगळ्या तरुण ब्राह्मण युवक-युवतींना आग्रह करीन, ‘स्पर्धेला घाबरू नका. शिपायापासून ते आयपीएसपर्यंत कोणत्याही पदासाठी नक्की प्रयत्न करा. तुम्ही यशस्वी व्हाल व मोठे योगदान द्याल.’ (साभार अमृत महाराष्ट्र)

प्रवीण दीक्षित

(लेखक निवृत्त पोलीस महासंचालक आहेत.)

MAHA AMRUTmaharashtra PolicePolice Mahasanchalak
Comments (0)
Add Comment