विदेशी विद्यापीठांतील अनुभव भारतासाठी समर्पित करणारे अमरावतीचे श्री. श्रेयस पन्नासे यांची राज्यसभेत संशोधक म्हणून निवड.
अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाचे माजी सहाय्यक प्राध्यापक तसेच अमरावती मधील सुप्रसिद्ध किड्स कॉर्नर प्ले हाऊस शाळेचे सहसंस्थापक आणि दि एसोसिएशन ऑफ रिसर्चर्स, एकेडेमीशियंन्स एंड यंग ऐक्टिविस्ट (अरण्य), भारतचे संस्थापक-सचिव व अमरावती शहरातील सुशोभीकरण तसेच सौंदर्यीकरणात सदैव अग्रसर राहणारी “आय – क्लीन अमरावती” या सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक श्री. श्रेयस दिलीपराव पन्नासे यांची भारतीय संसदेची प्रतिष्ठित राज्यसभा संशोधन आणि अभ्यास योजना (राज्यसभा रिसर्च अँड स्टडी स्कीम) मध्ये संशोधक म्हणून निवड झाली.
दि एसोसिएशन ऑफ रिसर्चर्स, एकेडेमीशियंन्स एंड यंग ऐक्टिविस्ट (अरण्य फाऊंडेशन) ही जगभरात विविध सामाजिक व भौगोलिक क्षेत्रात संशोधनात्मक कार्य करत असलेल्या ३५० पेक्षा जास्त सक्रिय संशोधकांची तसेच यु.पी.एस.सी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संस्था आहे. मागील वर्षी यु.पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण झालेले श्री. शुभम पवार (आय.पी.एस) आणि श्री. नीलेश अहिरवार (आय.आर.एस) हे देखील अरण्य संस्थेचे सदस्य होते. असंख्य अभ्यासू युवक-युवतींचे प्रेरणास्थानी असलेले श्री. श्रेयस पन्नासे यांनी २०१७ पासून अरण्य फाऊंडेशनच्या माध्यमातून अमरावती मधील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर मधील ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान मधील जनजाती समाज व वन्यजीवांसाठी तसेच ईशान्य भारतातील नागालँड राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी संशोधनात्मक कार्य केले.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई येथे शिक्षण घेत असतांना त्यांनी महाराष्ट्र पुनर्वसन कायदा, १९९९ अंतर्गत मेळघाट मधील जनजाती बांधवांचे पुनर्वसन झाल्यानंतरचे ढासडलेले आयुष्य या विषयावर संशोधन करुन डॉ. नितीन वसंतराव गणोरकर यांच्या मार्गदर्शनात “वोंम्ब ऑफ मेळघाट” या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माहितीपट/डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवत उत्कृष्ट चित्रपटाने सन्मानित “सायलेंट ईमर्जन्सि” ही मेळघाटातील कुपोषणाची भीषण परिस्थिती मांडली. नागालँड मधील कलम ३७१-अ या विषयावर “आयडेंटिटी”, ताडोबा-अंधारी क्षेत्रात वन्यजीव-मानव संघर्षावर “कॉनफ्लीक्ट” आणि वन हक्क कायदा, २००६ वर “सिनर्जी” ( हे सर्व माहितीपट/डॉक्युमेंट्री “अरण्य इंडिया” या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे) अशा विविध गंभीर व महत्वाच्या कायद्यांच्या सुधारनेच्या संबंधित एकूण पाच माहितीपट/डॉक्युमेंट्री व अहवाल शासनाला दिले.
संशोधन क्षेत्रातील त्यांचे नि:क्षपाती योगदान पाहता २०२१ मध्ये अमेरिकेतली हार्वर्ड विद्यापीठाने “रिसर्च मेथोडोलॉजी” या विषयाकरीत सहाय्यक प्राध्यापक म्हणून श्री. श्रेयस पन्नासे यांची निवड केली होती. साडेतीन वर्षे हार्वर्ड विद्यापीठाला सेवा दिल्यानंतर त्यांनी भारतात राहून भारतातील इच्छुक व अभ्यासू युवा पिढीला राष्ट्रहितासाठी उत्कृष्ट संशोधक बनविण्याचा संकल्प घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधक असलेले श्री. श्रेयस पन्नासे यांची राज्यसभेत संशोधक म्हणून निवड भारतभरातून मोजक्याच लोकांमध्ये झाल्याने जगभरातील संशोधन क्षेत्रातील परिचित प्रतिष्ठितांकडून आमरावतीच्या भूमिपुत्राचे कौतुक होत आहे.
•