भारतीय संविधानाच्या पायाशी लागलेली बंगालची आग !
भारतीय संविधानाच्या पायाशी लागलेली बंगालची आग !
बंगालमध्ये जे घडतंय ते फक्त वर्तमानपत्रातील एक कोरडी बातमी नाही, ती केवळ निवडणूक राजकारणाची प्रेतयात्रा नाही, ती आहे संपूर्ण राष्ट्राच्या अंतरात्म्यावर झालेली एक खोल जखम. ही आग निव्वळ घरांची नाही, ती संस्कृतीची आहे, श्रद्धेची आहे, आणि माणुसकीची आहे. या ज्वाळांच्या लपेटात जे जळतंय, ते एकेकटे हिंदू कुटुंब नाहीत, तर भारताच्या भविष्यातील एक एक वीट आहे. बंगालच्या गल्लीबोळात घुमणाऱ्या त्या भेसूर आक्रोशांचा आवाज आपण ऐकत आहोत, पण डोकं फिरवून घेत आहोत. एकविसाव्या शतकात, एका लोकशाहीत, एका घटनेच्या छायेखाली, जर एखाद्या समाजाच्या अस्तित्वालाच नकार दिला जात असेल, तर ती घटना नसून ती एक भयंकर षडयंत्राची फलश्रुती आहे.
मुर्शिदाबाद, मालदा, बीरभूम, हावडा, कोलकाता या नावांनी आपल्याला आता भौगोलिक माहिती आठवत नाही, तर ते नवे ‘अंधारकोपरे’ वाटू लागले आहेत. जेथे एकेकाळी क्रांतीचा झेंडा फडकत होता, तेथे आता मशिदींच्या आवाजात घंटानाद दाबला जातो आहे. रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक होते, पण त्याला ‘प्रतिक्रिया’ म्हणणारे मुख्यमंत्री आहेत. एखादी मुलगी रस्त्यातून पळवली जाते, तिच्यावर अत्याचार होतो, तिचं कुटुंब गुपचूप गाव सोडून जातं – आणि आपल्याकडे माध्यमं त्या घटनेला ‘स्थानिक वाद’ म्हणून टाळतात. या साऱ्याचा अर्थ आपण समजू शकलो नाही, की जाणूनही दुर्लक्ष करत आहोत? हा प्रश्न आता नुसता विचारायचा नाही – अंगावर बर्फासारखा बसवायचा आहे.
बंगालमध्ये वक्फ बोर्डाच्या आडून जमिनी बळकावल्या जात आहेत. स्थानिक हिंदूंना कागदपत्रं असूनही जमीन सोडावी लागते. जर त्यांनी विरोध केला, तर संपूर्ण कुटुंबावर जाळपोळ, बलात्कार, आणि जीवे मारण्याचे हल्ले होतात. एखाद्या पोलीस ठाण्याच्या समोर, एका आईच्या ओठांतून निघालेली ती हाक – “बाचाओ! माँ, मुझे मत जलाओ!” – हा फक्त भयपटातला संवाद नाही, तो वास्तव आहे. आणि आपल्या गोंधळलेल्या शांततेत ही हाक विरून जाते. पोलिस प्रशासन पक्षनिष्ठ आहे, न्यायसंस्था भयभीत आहे, आणि सामान्य माणूस रक्ताच्या दरवाजाशी निपचित पडलेला आहे.
हे फक्त बंगालपुरतं थांबलेलं नाही. बांगलादेशी घुसखोरी ही केवळ सीमा सुरक्षा दलासाठी एक समस्या नाही, ती आता आपल्या लोकसंख्येचं धार्मिक संख्याबळ बदलणारी प्रक्रिया आहे. ओळखीचे कागदपत्रे सहज मिळतात, मतदार कार्डं मिळतात, आणि त्या बदल्यात एक ठरलेला मतदान ‘ऋण’ उभा राहतो. ही ‘वोट बँक’ बनते, आणि मग सुरू होतं बहुसंख्याकांच्या अस्तित्वावरचं कटकारस्थान. जिथे अल्पसंख्य बहुसंख्यांवर राज्य करायला लागतात, तिथे काय होणार, याचा इतिहासाने वेळोवेळी दाखवून दिलं आहे. पण इतिहासाची पाने साचवून ठेवणं आणि त्यातून काही न शिकणं, हीच आपली सध्याची भूमिका झालेली आहे.
सत्तेसाठी हिंदू समाजाला गिळायचं ठरवलेलं आहे. आणि हे सगळं उघडपणे, मीडिया, पोलीस, आणि केंद्राच्या समोर होतंय. मग प्रश्न आहे – आपण तरी काय करतो आहोत? फेसबुकवर पोस्ट, व्हॉट्सअॅप स्टेटस, आणि एक-दोन मेणबत्त्यांच्या मूक आंदोलनाशिवाय आपल्या खांद्यावर कोणता जबाबदारीचा ओझा उरलाय? जेव्हा संपूर्ण देश एका राज्यात पेटत असतो, तेव्हा तो संपूर्ण देश दोषी ठरतो. केवळ घमंडी दीदींच्या विरोधात ओरडून काही होणार नाही, कारण त्या एक चेहरा आहेत – मूळ प्रश्न आहे आपल्या मौनाचा, आपल्या निष्क्रियतेचा, आणि आपल्या भीतीच्या मुखवट्याचा.
आज बंगालमधील मंदिरं उद्ध्वस्त होतात, शाळा जाळल्या जातात, शिक्षक घाबरून राजीनामे देतात, आणि बालकांना हिंदू धर्माच्या कथा शिकवायला मनाई केली जाते. सावरकर, विवेकानंद, नेताजी यांचं नाव घेतलं, तर तुम्हाला ‘कट्टरवादी’ ठरवलं जातं. हे वातावरण केवळ राजकीय नाही, ते मनोवैज्ञानिक आहे. एका पिढीच्या मनातून ‘स्वत्व’ संपवण्याचं षड्यंत्र आज बंगालमध्ये साकारतंय.
आपण आज जर गप्प राहिलो, तर उद्या हीच छाया आसाममध्ये, ओडिशात, आणि नंतर संपूर्ण भारतात पसरेल. राष्ट्रीय एकात्मतेची खरी कसोटी ही सीमारेषांवर नाही, ती आपल्या अंतःकरणात आहे. जर आपण आपल्याच बांधवांच्या वेदनेबद्दल उदासीन राहिलो, तर ‘भारत माता’ ही कल्पना केवळ पोस्टरपुरती उरेल. बंगालची वेदना ही तुमची आहे, माझी आहे, प्रत्येक जागरूक नागरिकाची आहे. जर ती नाही वाटत, तर आपली नागरिकत्वाची व्याख्या आधी तपासून बघा.
शेवटी, इतिहास नोंद ठेवतो. आपण कोणत्या वेळी काय बोललो, काय केलं, आणि काय केलं नाही, याचं साक्षीदार तो असतो. आज जर आपण आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्या पिढ्यांना गुलामीचं मूक ओझं उरलं असेल. बंगालमध्ये एक नव्या प्रकारचं युद्ध सुरू आहे – शस्त्रं नाहीत, पण विचार मारले जात आहेत. बंदुका नाहीत, पण मनं गिळली जात आहेत. आणि म्हणूनच, ह्या युद्धात मौन म्हणजे पराभव आहे.
बंगालची आग आज संपूर्ण भारताच्या दाराशी आहे. तिची जाणीव असणं, आणि तिचा प्रतिकार करणं, ही आपली एकमेव राष्ट्रीय जबाबदारी आहे. ही जागा फक्त राजकीय आंदोलनासाठी नाही, ही माणुसकीच्या नव्या लढाईसाठी आहे. आणि या लढाईत, आपल्या मनात जर अजूनही थोडासा शौर्याचा श्वास शिल्लक असेल, तर तो आता वापरण्याची वेळ आली आहे. बंगालच्या त्या राखेतून जर पुन्हा रामप्रसाद बिस्मिल, नेताजी, किंवा खुद्द विवेकानंद उठवायचे असतील – तर आपल्यालाच उठावं लागेल. कारण इतिहासाच्या न्यायालयात, उद्या आपला मौनच ‘दोषी’ ठरेल!
प्रा. भगवत भांगे
सेवासदन शिक्षण संस्था, नागपूर,
7276469800