“ बुद्ध आणि त्यांचा धम्म “ -अमृत तत्वाचा अमृत ग्रंथ !

0
“ बुद्ध आणि त्यांचा धम्म “ -अमृत तत्वाचा अमृत ग्रंथ !
बुद्ध आणि त्यांचा धम्म हा बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नितांत सुंदर ग्रंथ असून ज्यात ज्ञानसागर असलेल्या बौद्ध तत्वज्ञानाचा सर्वसामान्यांना कळेल असा बुद्धधम्माचा अर्क विशद केला आहे.ज्याप्रमाणे श्रीमद्भगवद्गिता,श्रीगुरुग्रंथसाहेब ,जैनागम, त्रिपिटक असे धर्मग्रंथ आहेत तद्वतच सर्वसामान्य बौद्ध अनुयायी बांधवांसाठी “ बुद्ध आणि त्यांचा धम्म “ हा धम्मग्रंथ आहे.या ग्रंथाचे भव्य प्रमाणात सामुहीक वाचन श्रद्धा आणि निष्ठपुर्वक होत असते.या ग्रंथ निर्मितीचा इतिहास आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्धधम्म स्विकारला.धम्मचक्र प्रवर्तनानंतर काही आठवड्यात म्हणजे ६ डिसेंबर १९५६ ला त्यांचे महापरीनिर्वाण झाले.आपल्या मृत्यूपुर्वी त्यांनी “ बुद्ध आणि त्यांचा धम्म “ हा अमृततत्वाचा अमृतग्रंथ लिहून पुर्ण केला.त्यांच्या महापरीनिर्वाणानंतर १९५७ ला पिपुल्स एज्यूकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रकाशन संस्थेने या ग्रंथाचे प्रकाशन करुन सर्वांसाठी हा “ सिध्द आणि बुद्ध “ ग्रंथ उपलब्ध करुन दिला.सुरुवातीला हा ग्रंथ “ The buddha and his dhamma “ या नावाने इंग्रजी भाषेत प्रकाशित झाला त्यानंतर यथावकाश हा ग्रंथ अनेक भाषेत भाषांतरित होऊन प्रकाशित झाला.
या ग्रंथाच्या निर्माणाची विकासात्मक उकल ( progressive unfoldment ) आहे.सन १९५१ ला महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकांनी वैशाख अंकासाठी लेख लिहिण्याची विनंती डॉ.बाबासाहेबांना केली.त्या मासिकासाठी डॉ.आंबेडकरांनी बौद्ध तत्वज्ञानावर लेख लिहिला.तो लेख प्रचंड गाजला.बौद्ध वाड•मयाची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की सर्वसामान्यांसाठी ते संपूर्ण अभ्यासणे कठीण होते.डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेल्या या लेखामुळे  सर्वांसाठी समजेल असे सहज आणि सोपे बौद्ध तत्वज्ञान लिहिण्याची विनंती अनेकांनी बाबासाहेबांना केली.त्या सर्वांच्या आग्रहाखातर बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बौद्ध तत्वज्ञान एकाच ग्रंथात सामावेल असा हा धम्मग्रंथ लिहिला.बौद्धधम्माचे सार असलेला हा ग्रंथ पवित्र ग्रंथ म्हणून अजरामर झाला. डॉ.बाबासाहेबांनी “ बौद्धतत्वज्ञान”  धर्मांतराची घोषणा केल्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर १९३५ नंतर अभ्यासले असा अनेकांचा गैरसमज आहे.पण दस्तूरखुद्द बाबासाहेबांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत स्पष्ट केले की त्यांना ते इंग्रजी चौथी उत्तीर्ण झाल्याप्रित्यर्थ गुरुवर्य दादा केळुस्करांनी स्वतः लीहिलेले भगवान बुद्धाचे चरित्र भेट म्हणून  दिले.ते पुस्तक “ बुद्ध आणि त्यांचा धम्म “ या ग्रंथाचे बिजारोपण ठरले.पुढे अनेक गोष्टी या ग्रंथासाठी कारणीभूत ठरल्या हे पण वास्तव आहे.काही तारखा आणि प्रसंगातून हे स्पष्ट होईल. ३१ जुलै १९२० च्या मूकनायक च्या तर ३ जुन १९२७ च्या बहिष्कृत भारत मधून त्यांनी बुद्ध तत्वज्ञान हे समानतेचे हे लेखातुन स्पष्ट केले.२५ सप्टेबर १९२८ दादरच्या सार्वजनिक भाषणातून,३१ मे १९३६ ला अखिल मुंबई इलाखा महार परिषदेतून,१७ मे १९४१ ला जनता वृत्तपत्रातून,२४ सप्टेबर १९४४ ला मद्रास येथील भाषणातून, २ मे १९५० आणि २० मे १९५१ च्या नवीदिल्ली येथिल ,२६ मे १९५३ मुंबई येथील भव्य बुद्धजयंती कार्यक्रमातून,१५ फेब्रुवारी १९५३ च्या इंडोजापान सांस्कृतिक संघटनेच्या  कार्यक्रमातून म्हणजे अशा अनेक कार्यक्रमातून डॉ.बाबासाहेबांनी बुद्धधम्म “ अभ्यास आणि चिंतन “ करुन सार्वजनिक मांडला.तो पर्यंत त्यांनी धम्म स्विकारला नव्हता.त्यानंतर १४ ऑक्टोबर १९५६ ला धम्मचक्र प्रवर्तन झाले हे विशेष !
धर्मांतरणाची घोषणा केल्यावर बाबासाहेब तब्बल विस वर्ष थांबले.या विस वर्षात उसवलेले शिवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही हे दुर्दैवच.मधल्या काळात ख्रिश्चन,मुस्लिम धर्मिय अनेक प्रलोभनासह आपला धर्म स्विकारावा यासाठी डॉ.बाबासाहेबांना भेटले.पण बाबासाहेबांनी त्यांना कारणमिमांसेसह स्पष्ट नकार दिला. कारण भगवान बुद्धांचा धम्म त्यांना लहानपणापासून ज्ञात होता.भारतीय मातीतच निर्माण झालेला आणि भारतीय संस्कृतीशी समरस असलेला बौद्धधम्म त्यांनी स्विकारला.त्यांनी धम्म स्विकारण्याआधिच ते धम्म अंगीकारत होते.धम्मदीक्षेनंतर त्यांनी तोच धम्म यथार्थपणे ज्या ग्रंथात त्यांनी मांडला त्या ग्रंथाचे नाव आहे “ बुद्ध आणि त्यांचा धम्म” .या ग्रंथाचे त्यांनी आठ खंडात विभाजन केले आहे.प्रथम खंडात सिद्धार्थ गौतम बुद्ध कसे झाले ? द्वितीय खंडात धम्मदीक्षा अभियान,तृतीय खंडात बुद्धाची शिकवण,चतुर्थ खंडात धर्म आणि धम्म यावर विश्लेषण, पंचम खंडात भिक्खु संघाबद्दल तर षष्ठम् खंडात बुद्ध आणि त्यांचे समकालीन बिंबिसार आदींची चर्चा आहे.सप्तम खंडात भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण सांगितले आहे.अष्टम खंडात महामानव सिद्धार्थ गौतम यांचे व्यक्तित्व आणि समारोपीय प्रकटगुह्य आहे.
या ग्रंथात प्रामुख्याने “ अत्त दिप भव “ हे बुद्ध तत्वज्ञान दृष्टांत आणि सिद्धांताची सांगड घालत सांगितले आहे.तुम्ही दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा ! पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका ! स्वतःवर विश्वास ठेवा ! दुसऱ्या कोणाच्या अंकित राहू नका ! सत्याला धरून रहा ! सत्याचाच आश्रय करा ! दुसऱ्याला शरण जावू नका ! हा मार्ग भगवान बुद्धांनी आपले शिष्य भिक्खु आनंद यांना सांगितला तो या ग्रंथात महापरिनिर्वाण खंडात डॉ.बाबासाहेबांनी बौद्ध तत्वज्ञानाचा एका अर्थानी “ काढा “ दिलेला आहे.
सम्यक दृष्टि,सम्यक संकल्प,सम्यक वाणी,सम्यक कर्मांत,सम्यक आजिविका,सम्यक व्यायाम,सम्यक स्मृती,सम्यक समाधी यावर केलेली चर्चा म्हणजे “ जेथ चातुर्य शहाणे झाले आणि प्रमेय रुचिशी आले” असेच आहे.कठीण सिद्धांत सोप्या भाषेत डॉ.बाबासाहेबांनी या ग्रंथात सांगितले आहेत. नवीन पिढीला वास्तविक बुद्धतत्व समजावे हा महामानव डॉ.बाबासाहेबांचा हेतू त्यांनी स्वतःच स्पष्ट केला.त्यासाठी त्यांनी चार प्रश्नांच्या अनुशंघाने “बुद्ध आणि त्यांचा धम्म“ विशदबोध केला. 
१)भगवान बुद्ध परिव्राजक का बनले ? त्यांनी प्रेतयात्रा पाहिली,जर्जर झालेला वृद्ध माणूस पाहिला,निस्तेज आणि गलितगात्र झालेला रोगी पाहिला म्हणून त्यांना विरक्ती आली की अजुन कोणती कारणे होती ?
२)चार आर्यसत्ये मानवाला दुःखाकडून सुखाकडे नेण्याचा मार्ग आहेत का ?
३) आत्मा,कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पना आहेत की वास्तव ?
४)भिक्खुसंघ निर्माण करण्यामागे तथागतांचा हेतू काय होता ? विज्ञाननिष्ठ धम्माचे विश्लेषण या पायाभूत प्रश्नांच्या आधारे या ग्रंथात दिसते.
हा ग्रंथ का अभ्यासावा ?
एकतर या ग्रंथाचे विवेचन सत्याच्या कसोटीवर प्रत्यक्ष महामानव डॉ.बाबासाहेबांनी चिंतन करुन मांडले आहे. पुनर्जन्माच्या सिद्धांताबाबत बौद्धमत काय आहे ? याबाबत अनेक संभ्रम आहेत.या बाबत स्पष्ट मत या ग्रंथात आहे. कर्मविपाक सिद्धांताबाबत बौद्धमत ,अहिंसेचा खरा अर्थ,बलप्रयोगाने धम्मदीक्षा देता येते का ? धम्म,सद्धम्म,अधम्म म्हणजे काय ?भिक्खु,उपासक यांची आचार संहिता या सर्व प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे या ग्रंथात डॉ.बाबासाहेबांनी विदित केली आहेत.म्हणून हा ग्रंथ वाचावा. या ग्रंथाच्या माध्यमातुन डॉ.बाबासाहेबांनी समाजोन्नतीसाठी भगवान बुद्धांची काही तत्वे मुद्दाम सांगितली आहेत.जसे धम्म ज्या खांबावर उभा आहे ते तीन खांब म्हणजे दान,शिल आणि भावना.यातून समाजाप्रती औदार्य,स्वतःच्या जीवनात नैतिकता आणि भावनेतून आपल्या मनाचे प्रशिक्षण कसे होते हे सांगितले आहे. धम्माचे पंच वर्ज्यसुत्रे सांगतांना त्यांनी १) सजिव प्राण्यांची हत्या २) चोरी ३) लैंगिक गैरवर्तन ४) खोटे बोलणे ५)मद्यपानादी नशा ह्या गोष्टी निषिद्ध आणि वर्ज्य सांगितल्या.या बाबत स्वतः डॉ.बाबासाहेब फार कडक आणि कठोर होते.याची अनेक उदाहरणे आहेत. बौद्ध धम्मात पाच अक्षम्य पापे सांगितली आहेत.त्यात पाचवे पाप म्हणजे बौद्धधर्मात फुट पाडणे होय.डॉ.बाबासाहेबांनी यासाठी केवळ भारतातच नाही तर जगातला धम्म एक करण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या लक्षात आले की हीनयान आणि महायान या विचारात बौद्धधर्म विभागला गेला होता.तात्विक अल्पभेदाने मतभिन्नता असल्या तरी बौद्धधम्म तत्वज्ञान एकच आहे असे त्यांनी सर्वांना सांगितले.सर्व अनुयायांनी या पाचव्या अक्षम्य पापापासून मुक्त होण्याची आवश्यकता आहे.आजचा विचार केला तर बोधिसत्व डॉ.बाबासाहेबांची दूरदृष्टिता लक्षात येईल. बौद्धधर्म हा याच भारतीय सभ्यतेत निर्माण झालेला, रूजलेला आणि इथूनच सर्वत्र वर्धित झालेला धम्म आहे. स्वामी विवेकानंदांनी तर खूप प्रेम आणि आदराने म्हटले की “ buddhism is rebel child of hinduism “बौद्धधर्म हा हिंदूधर्माचे बंडखोर अपत्य आहे “ त्यामुळे हिंदूधर्म आणि बुद्धधम्म यांच्यात वैचारीक मतभिन्नता आहे मनभिन्नता नाही म्हणजे दोघांचाही डीएनए एकच आहे. म्हणूनच डॉ.बाबासाहेबांनी संविधानात हिंदूकोड बिलात हिंदू ,जैन,सिख्ख यांच्यासह बौद्धांचाही समावेश केला आहे.ही सर्व एकाच आईची म्हणजे भारतमातेची लेकरे आहेत. बोधिसत्व डॉ.बाबासाहेबांनी “ बुद्ध आणि त्यांचा धम्म “ तथागत गौतम बुद्धांच्या जीवनाचा घटनाक्रम कथा रुपात मांडला आहे.दृष्टांत आणि सिद्धांत यांची सांगड घालणाऱ्या या ग्रंथातून “ जगात शांती निर्माणाची आणि चारित्र्यसंपन्न मनुष्य निर्माणाची “ गुरुकिल्ली दिली आहे. म्हणूनच तो अमृत तत्वाचा अमृत ग्रंथ होय.
विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी,वाशिम.
९८२२२६२७३५
Leave A Reply

Your email address will not be published.