पितृपक्ष : तर्पण आणि अर्पणाचा उत्सव.
पितृपक्ष हा पूर्वजांच्या स्मरणाबरोबरच व्यक्तिमत्व निर्माण, कुटुंब एकता आणि निसर्गाशी सामंजस्य साधण्याची संधी आहे.
श्राद्ध, तर्पण आणि ‘पाच ग्रास’ ही परंपरा जीवसृष्टीच्या संरक्षणाचा व सदाचाराचा संदेश देणारी आहे. या विधींमधून केवळ पितरांचे स्मरण होत नाही, तर कुटुंबात एकोपा, पिढ्यांतील नात्यांचा सन्मान आणि सर्व जीवांप्रती करुणा जोपासली जाते. निसर्गाशी संतुलन राखण्याचा संदेश देत पितृपक्ष हा समाजात नैतिक मूल्ये दृढ करणारा आणि जीवनाकडे कृतज्ञतेने पाहण्याची प्रेरणा देणारा पर्व मानला जातो. संपूर्ण जगात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र भारतात पूर्वजांच्या स्मरणाची ही पितृपक्षाची परंपरा व्यक्तिमत्व घडविणारी, कुटुंबाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारी आणि निसर्गाशी समन्वय साधणारी अशी अद्भुत परंपरा मानली जाते. भारतीय आणि पाश्चात्त्य चिंतनात मूलभूत फरक आहे. पाश्चात्त्य चिंतन मुख्यत्वे बाह्य जग म्हणजेच भौतिक सृष्टीपुरते मर्यादित आहे, तर भारतीय चिंतन हे लौकिकापासून अलौकिक सृष्टीपर्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक आहे.थे विकासाचा आधार फक्त बाह्य साधनांवर नाही, तर अंतःशक्तीच्या संवर्धनावरही मानला गेला आहे. ही वैशिष्ट्य भारतीय सनातन परंपरेतील सर्व सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक समागमांत प्रतिबिंबित होते आणि पितृपक्ष हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.