कन्यादान म्हणजे गोत्रप्रदान !!

0

कन्यादान म्हणजे गोत्रप्रदान !!

हा विषय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार असलेले माझे एक मित्र मला भेटायला आले.गप्पागप्पात कन्यादानावर विषय आला.ते म्हणाले कन्या जर दानात द्यायची वस्तू असेल तर मी कन्यादान न करता नोंदणीकृत विवाह करेल.तेंव्हा त्यांच्याशी कन्यादानावर मी शास्त्रीय चर्चा केल्यावर त्यांचे मतपरिवर्तन झाले.

भारतीय कुटुंबपध्दती जगात सर्वश्रेष्ठ असून जीवनात सुख आणि शांतीचा मार्गसोपान म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्था आहे.म्हणूनच “धन्यो गृहस्थाश्रमः “ म्हटले जाते. अशांत जगात शांतीचा मार्ग म्हणून आपल्या भारतीय कुटुंबव्यवस्थेचा अभ्यास होत आहे. एकीकडे वर्षभर लग्न टिकले म्हणून लग्नाचा वाढदिवस (वेडिंग अनिव्हर्सरी)साजरे करणारी पाश्चात्य संस्कृति कुठे अन् साता जन्माच्या गाठी मानणारी आपली भारतीय संस्कृती कुठे ? विवाह हे कंत्राट मानणारी विदेशी भावना आणि विवाह हा संस्कार मानणारी हिंदू संस्कृती यांच्यात तुलना होणे अशक्यच .स्त्रिला उपभोग्य वस्तू मानणारे तिकडे तर “धर्मेच ,अर्थेच ,कामेच नातिचरामि “ असा संकल्प ,प्रतिज्ञा आणि शपथ घेणारी आणि स्त्रीला उच्चदर्जा देणारी आपली पवित्र संस्कृती इकडे आहे.
आपल्या कडे विवाह हा संस्कार असून लग्नबंधन म्हणजे “हृदया हृदय एक जाहले “ हा भाव आहे.लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन,दोन कुटुंबाचे मिलन ,दोन गोत्रांचा संगम. विवाह प्रक्रियेत मुलगा मुलगी एकमेकांना पाहतात,दोघांचीही पसंती विचारली जाते,दोघांनीही एकमेकांना पसंती दिली तर घराणी अभ्यासली जातात,वाग्निश्चय , सिमांतपूजन इत्यादी प्रक्रियेतून नियोजनबद्ध असा विवाह सोहळा साकारला जातो. लग्नसंस्कारात अत्यंत भावपूर्ण ,तितकाच महत्वाचा आणि अग्नीच्या साक्षीने केला जाणारा विधी म्हणजे कन्यादान विधी होय. “कन्यादान “ या शब्दावर बरीच उलटसुलट चर्चा नेहमीच होत असते.कन्या काय वस्तू आहे का म्हणून तिचे दान होते ? वगैरे वगैरे बाबिंवर वादसंवाद होतात. खरं म्हणजे या विधीला “कन्यादान “ हा शब्द वापरणे शास्त्रसंमत नाही . पण तो रूढ झालेला प्रचलित शब्द आहे. “कन्यादान “ हा शब्द रूढ का झाला असावा ? तर कन्या म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा ,मायबापाची अंगक ,जीवीची जीवलग.तळहातावरच्या फोडाप्रमाणे,अंत्यंतिक प्रेमाने लालनपालन , शिक्षण, संस्कार करत जिवापाड जपायचं आणि ही मुलगी वयात आली  की हा काळजाचा तुकडा परक्या घरी पाठवायचा.यातील मनोसंवेदना फक्त मायबापच अनुभवतात.मायबाप सोडून ती अनुभूती इतरांना शक्य नाही.
महाकवी कालिदासांनी अभिज्ञान शाकुंतलात जेंव्हा शकुंतला सासरी जाते तेंव्हाची कण्व महामुनींची भावावस्था वर्णन केली.
यास्यत्यद्य शकुन्तलेति ह्रदयं संसपृष्टमुत्कण्ठया,
कण्ठः स्तम्भितवाष्पवृत्तिकलुषश्चिन्ताजडंदर्शनम् 〡
वैक्लव्यं मम तावदीदृशमिदं स्नेहादरण्योकसः,
पीड्यन्ते गृहिण: कथं न तनयाविश्लेषदु:खैनवैः ⅼⅼ
शकुंतला ही काण्वमहामुनींची मानस कन्या,काण्वमुनी संन्यस्त आणि आश्रमवासी असे असूनही शकुंतलेच्या सासरी जाण्याने योगीअसलेले कण्व ऋषी सख्ख्या नाही तर मानलेल्या कन्येसाठी विव्हळ झाले.ते संन्यासी असून भावविभोर होतात तर सामान्य संसारी मायबापांच्या अवस्थेची कल्पनाच न केलेलीच बरी, या भावविव्हळ अवस्थेत काण्वमहामुनींच्या तोंडी शब्द येतात
“अर्थो हि कन्या परकीय एव । तामद्य सम्प्रेष्य परिग्रहीतुः। जातो ममायं विशदः प्रकामं ।प्रत्यर्पितन्यास इवान्तरात्मा॥
मुलगी काळजाचा तुकडा असला तरी तिचे लग्न झाल्यावर तिच्या बापाला हलके वाटते .आपल्याकडे जवाबदारीतून मुक्त झालो म्हणण्याचा प्रघात आहे.ही वस्तुस्थिती आहे.
“दिल्या घरी तु सुखी रहा “ हा भाव मनात असतोच. हेच आपण मंगलाष्टक म्हणताना “कन्या हे परकीय वित्त म्हणूनी , निर्व्याज सांभाळीले “ म्हणतो. याचा अर्थ कन्या ही दानवस्तू होत नाही तर ते परकोटीचे प्रेम आहे. व्यवहारातही आपण नेहमीच म्हणतो “पैसा नाही कमावला मी ! पण मुले पायावर उभी केलीत .माझी मुलेच माझी संपत्ती ! इथे मुले म्हणजे धन,संपत्ती नसुन तो स्वाभिमान आहे. बरं ! कन्या आहे म्हणून तिला अधिकार नाही असे आपल्या भारतात मुळीच नव्हते. उलट भारतीय संस्कृतित अनेक स्वयंवर कथा आपल्याला माहीत आहेत. स्वयंवरा मध्ये “ वर “ निवडीचा अधिकारच उपवर कन्येला दिलेला आहे.यात कन्या आलेल्या वरापैकी आपल्या पसंतीच्या एकाच्या गळ्यात वरमाला घालायची.याचा अर्थ बाकीच्यांना ती नकार द्यायची.तिचा नकाराधिकार अबाधित असायचा.यावरून हेच सिध्द होते की कन्या पूर्णाधिकारी असायची त्यामुळे ती दानाची वस्तू कधीच नव्हती.उलट “ वर “ पसंतीत पूर्वापार तिचे पुर्ण मत घेतल्या जात होते .आताही मुलीची पसंती नसेल तर विवाह पुढे सरकत नाही.
म्हणून “कन्यादान “ हा शब्दाशः अर्थ घेणे योग्य नसुन त्यातील गर्भितार्थ आणि रुढार्थ देखील समजून घेतला पाहिजे.
कन्यादान हा शब्द रुढार्थ असेल तर मुळ शब्द कोणता ? हा प्रश्न सहाजिक आहे. हिंदुधर्मात “कन्यादान “ हा विवाहातिल विधि आहे. कन्यादान हा रूढार्थाने वापरला गेलेला आणि वारंवारीतेमुळे प्रचलित झालेला शब्द असून शास्त्रात त्याला “गोत्रदान “ म्हणतात.कन्या दान ही दानाच्या पेक्षाही अधिक उच्च कृती म्हणून ह्या विधिला गोत्र प्रदान विधी म्हटले आहे. दानात अपेक्षा असतात पण प्रदान निरपेक्ष असते.म्हणून गोत्रप्रदान अत्युत्तम. ते आपण समज़ुन घेऊ. मुलगी ज्या कुळात जन्माला आली ते तिचे जन्म कुळ.त्या कुळाचे जे गोत्र तेच मुलीचेही जन्मगोत्र. जन्म होताच वडिलांचे गोत्र तिला प्राप्त होते अर्थातच हेच तिचे जन्मजात गोत्र .वयात येईपर्यंत ती याचं गोत्रात लहानाची मोठी होते.आपल्या वडील कुलात वाढता वाढता वयात आल्यावर तिचा विवाह करणे क्रमप्राप्त होते. लग्न होतांना ती आपल्या वडिलांच्या कुळातून पतीच्या कुळात जाते.म्हणजे तिचे कुलांतर होते .
आता तिला माहेर सोडून सासर धारण करावे लागते. सहाजिकच वडिलांचे कुळ सोडून तिला पतीकुळात पुढील जीवन व्यतीत करावयाचे असते. तिला आता वडिलांच्या नावाचा त्याग करुन पतीचे नाव धारण करण्याची पद्धत पौराणिक काळापासून आहे.आताही हीच पद्धत “संविधान संमत “ आहे. त्यामुळे सहाजिकच वडिलांच्या गोत्राचा त्याग करुन आपल्या पतीचे कुळ म्हणजे गोत्र तिला धारण करावे लागते.एका कुळाचा म्हणजे गोत्राचा त्याग आणि दुसऱ्या गोत्राचा स्विकार करायचा.पितृगोत्र प्रदान करायच आणि पतीगोत्राचे आदान. अग्नीच्या साक्षीने मुलगी आपल्या पितृगोत्राचे जातवेद अग्निला दान करते.आणि त्याच अग्नीच्या साक्षीने पतीच्या गोत्राचे आदान म्हणजे पतीगोत्राचा ती स्विकार करते. वडिलांचे गोत्र ती अग्नीला प्रदान करते.तिचा होणारा पती आपले स्वतःचे गोत्र तिला प्रदान करतो.म्हणूनच या संपूर्ण विधीला “गोत्रप्रदान विधी “ म्हटले आहे.ज्याला रुढी परंपरेत कन्यादान म्हंटले जाते.मुळात ते कन्यादान नसुन गोत्रप्रदान आहे. जसे एखाद्याचे मुळ नाव वेगळेच असते समजा मधुसुदन आहे.ते दस्तावेजावर वापरले जाते पण समजा बाळासाहेब हे त्याचे टोपणंनाव असेल तर तो टोपणनावाने जास्त परिचित असतो.पण आधारकार्डावर त्याचे खरे नाव मधुसुदनच असते आणि तेच अधिकृत समजले जाते.पण बाळासाहेब हा त्याचा चिरपरिचय.
तद्वतच विवाह संस्कारांत “गौत्र दान विधि “ हे मुळ विधीनाम आहे पण विधीचे टोपणंनाव कन्यादान होय.त्याच नावाने हा विधि चिरपरिचित आहे पण मुळ गोत्रदान विधीच आहे.
मुळातच हिंदु संस्कृतीत स्त्री ही माता ,शक्ती स्वरूपा आणि पूजनीय मानली आहे.आपली संस्कृति शिवशक्तीऐक्यावर आधारित आहे.शक्तीशिवाय शिव नाही आणि शिवाशिवाय शक्ती नाही. त्यामुळे कन्येला वस्तू संबोधणे शक्यच नाही.ती कुटुंबाचा मूलाधार आहे. थोडक्यात वारंवारितेमुळे रूढ झालेला शब्द कन्यादान असला तरी ते गोत्रदान आहे. तस्मात् ते कन्यादान नव्हे तर गोत्रप्रदान होय. कन्यादान हा रूढ झालेला शब्द असून त्याचा गैरअर्थ कोणीही काढू नये .कन्या ही वस्तू नसुन ती गृहलक्ष्मी आहे. तीच आपला गृहस्थाश्रम धन्य करते . 
सानन्दं सदनं सुताश्च सुधियः कान्ता प्रियभाषिणी।
सन्मित्रं सधनं स्वयोषिति रतिः चाज्ञापराः सेवकाः।।
आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्ठान्नपानं गृहे।
साधोः सङ्गमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमः॥

विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी, वाशीम. ९८२२२६२७३५

Leave A Reply

Your email address will not be published.