मुलांच्या जडण-घडणीत आजीआजोबांची भूमिका.

0

मुलांच्या जडण-घडणीत आजीआजोबांची भूमिका.

 

मोठी माणसं घरात असणे म्हणजे घराला एक मोठ्ठा आधार असतो, त्यांच्या विचारांचा आणि अनुभवांचा. त्यांनी बघितलेले आयुष्यातील चढ-उतार व अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन कुटुंबाला स्थैर्य देतं आणि घरतील लहान मुलांना संस्कार व प्रेम. आजी आजोबांना दुधावरची साय जास्त प्रिय असते अस म्हणतात. म्हणून त्यांच्यातील नाते हे विशेष रूपानी तयार होते. त्यांचे हसरे चेहरे, गोष्टी सांगण्याची पद्धत, आवडीचे पदार्थ करणे, खेळणी घेऊन देणे, त्यांचा निस्वार्थ पणे सांभाळ करणे आणि नातवंडांच्या प्रत्येक लहानसहान गोष्टीतून ओसंडून वाहणार प्रेम हेच त्यांचे आयुष्याचे खरे समाधान असते. पण याच भावनेच्या भरात वाहत जाऊन कुठे तरी नातवंडांच्या जडणघडणीत चुकीचा संदेश तर जात नाही आहे याचे आत्मपरीक्षण करायला हवे.  असे का?

८ वर्षांचा आर्यन अभ्यासाऐवजी संध्याकाळी गोड मिठाई खात कार्टून बघायला बसतो.
आई लगेच म्हणते :“आर्यन, आत्ता अभ्यास पूर्ण कर. मग कार्टून बघायला मिळेल. आणि जास्त गोड नको खाऊ रे, नियम पाळायला हवेत.”

इतक्यात आजी हळूच म्हणते : “अगं, अभ्यास तर रोजच करतो ना! थोडं कार्टून बघू दे न, आणि खाऊ दे न त्याला गोड, लहान आहे अजून तो.”

आर्यनच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. तो म्हणतो :“आजी म्हणते ना बघू दे! मग मी बघतो.”

आई रागावते :“असं नाही चालणार. आत्ता अभ्यासच करायचा आहे.”

पण आजी पुन्हा मुलाला कवेत घेत म्हणते :“काय रागावतेस? माझ्या काळात आम्ही दिवसभर खेळायचो, तरीही मोठे झालोच की, आणि  खूप गोड पण खायचो. आम्हाला कुठे काय झाल ते गोड खाऊन.  खाऊ दे त्याला.”

आर्यन च्या मनात निर्माण झालेला गोंधळ

मुलाला समजत नाही काय बरोबर. तो ठरवतो, “आजीचं ऐकलं तर लगेच मज्जा करायला मिळते. आईचं ऐकलं तर राग येतो आणि मज्जा करायला मिळत नाही.” हळूहळू तो आईच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करतो.

हि परिस्थिती बहुतांश घरामध्ये दिसते,  परिणामी मुलं नियमांचं महत्त्व समजून घेत नाही. पालक आणि मुलांमध्ये दुरावा निर्माण होतो. आजी आजोबा नकळत मुलांच्या शिस्तभंगाला पाठिंबा देतात. आणि घरात ताणतणाव वाढतो. एका बाजूला पालक आधुनिक जीवनशैली, तंत्रज्ञान व बदलत्या समाजरचनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात, तर दुसऱ्या बाजूला आजीआजोबा त्यांच्या काळात रममान असतात. या दोन प्रवाहांमध्ये तणावही असतो आणि संधीही.  

आजची लहान मुलं दोन पिढ्यांच्या प्रभावाखाली वाढतात. एका बाजूला आजी-आजोबा म्हणजेच बेबी बूमर पिढी, तर दुसऱ्या बाजूला आई-वडील म्हणजे मिलेनियल पिढी. या दोन पिढ्यांची जीवनशैली, विचार करण्याची पद्धत आणि मूल्यं यांमध्ये मोठा फरक आहे. आणि याच ठिकाणी मुलांच्या जडणघडणीचं आव्हान उभं राहतं.

बूमर पिढीचा स्वभाव आणि विचारसरणी

बूमर पिढी साधारण 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेली. या काळात समाजात स्थैर्य, मर्यादित साधनं आणि परंपरा यांना महत्त्व होतं. या पिढीला कुटुंबकेंद्रित जीवनशैली प्रिय होती. नाती जपणं, घरातील एकोप्याला प्राधान्य देणं आणि साधेपणात समाधान मानणं हे त्यांचे वैशिष्ट्य. या पिढीच्या दृष्टीने बालपण म्हणजे खेळ, आनंद आणि मोकळं वातावरण. त्यांना वाटतं की जास्त बंधनं किंवा शिस्त न घालता मुलं आपोआप मोठी होतात. त्यांच्या अनुभवातून मिळालेलं जगण्याचं शहाणपण ते नातवंडांना सांगतात

मिलेनियल पिढीचा स्वभाव आणि विचारसरणी

मिलेनियल पिढी साधारण 1981 ते 1996 दरम्यान जन्मलेली. या पिढीने तंत्रज्ञान, स्पर्धा आणि वेगाने बदलणारा समाज जवळून अनुभवला आहे. त्यांचं बालपण साधं होतं, पण युवावस्थेत आल्यावर त्यांनी जागतिकीकरण, संगणकयुग आणि करिअरची धडपड पाहिली. त्यामुळे या पिढीच्या दृष्टीने शिस्त, शिक्षण, वेळेचं नियोजन आणि स्वावलंबन यांना प्रचंड महत्त्व आहे.

मिलेनियल पालकांना वाटतं की मुलांनी फक्त आनंदात मोठं होता कामा नये. आजच्या स्पर्धात्मक काळात टिकण्यासाठी मुलांना अभ्यास, कौशल्यं, तंत्रज्ञान आणि जबाबदारी शिकणं अनिवार्य आहे. त्यामुळे ते मुलांवर थोडं कडकपणे नियम लादतात, त्यांना वेळेचं भान शिकवतात आणि करिअरच्या तयारीसाठी लहानपणापासून मार्गदर्शन करतात.

संघर्ष कुठे होतो?

बूमर पिढीच्या नजरेत मुलांवर ताण आणू नये, तर मोकळं बालपण द्यावं. तर मिलेनियल पिढीच्या दृष्टीने ताण नव्हे तर शिस्त आणि वेळेचं नियोजनच मुलांच्या भविष्यासाठी आवश्यक आहे.
या दोन विचारसरणी मुलांच्या समोर विरुद्ध संदेश उभे करतात.

एकमेकांना समजून घेणं का महत्त्वाचं?

मुलांच्या जडणघडणीत प्रेम आणि शिस्त दोन्हींची गरज असते. बूमर पिढीचा अनुभव, प्रेम आणि संस्कार मुलांच्या भावनिक विकासासाठी महत्त्वाचे आहेत. तर मिलेनियल पिढीची शिस्त, शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आधुनिक काळाशी जुळवून घेण्याची धडपड मुलांच्या बौद्धिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक आहे.

म्हणूनच या दोन पिढ्यांनी एकमेकांना पूरक ठरलं पाहिजे. पालकांनी आजी-आजोबांचा अनुभव नाकारू नये, तर त्यातून मुलांना संस्कार देण्याचं साधन शोधावं. आजी-आजोबांनी पालकांची चिंता समजून घेतली पाहिजे आणि त्यांच्या शिस्तीला पाठिंबा दिला पाहिजे. घरातले नियम सर्वांनी मान्य केले, तर मुलांपुढे एकसमान संदेश जाईल आणि त्यांचा गोंधळ दूर होईल.

निष्कर्ष: आजी-आजोबा हे सावलीसारखे असतात. त्यांचं प्रेम, त्यांचे आशीर्वाद हेच मुलांचे खरे भांडवल आहे. पालकांनी शिस्त दिली आणि आजी-आजोबांनी प्रेम दिले, तर मुलं संस्कार, आत्मविश्वास आणि जबाबदारी यांचं सुंदर मिश्रण घेऊन वाढतात. कारण, “खऱ्या अर्थाने कुटुंबाचं हृदय हे आजी-आजोबा असतात.

पल्लवी चिकारे-पळसकर

युवा रुरल असोशिएशन, नागपूर(स्किल इंडिया सर्टिफाइड पॅरेंटिंग कोच
सुजाण पालकत्व’ उपक्रम समन्वयक, युवा रुरल असोशिएशन, नागपूर
 9890665676
pallavi.chikare@yraindia.org)

Leave A Reply

Your email address will not be published.