स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चा उपक्रम.
दिनांक 12 एप्रिल 2026 ठरल्याप्रमाणे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चे मावळे बैतूल च्या दिशेने निघाले. पण बैतूल का? तिथे अस काय की एवढ्या भर उन्हात बाईक घेऊन 350 किलोमीटर चा सपाटा आम्हाला मारायचं धाडस झालं? त्याच कारण एक नाव. ते नाव म्हणजे नरसिंहदेव यादव
कोण हे नरसिंह देव यादव? हे सर्व प्रश्न मनात होते. म्हणून आम्ही रविवारी सकाळी निघालो शिवा दादा, प्रतीक पाथरे, प्रथमेश बाहेकर, राहुल भलावी, कृष्णा धांडे, श्रवण लांबट असे आम्ही सहा मावळे आपापल्या बाईक घेऊन बैतूल मार्गाने निघालो, आधी चांदूर बाजार वरून घाटलाडकी मार्गे आठनेर ला पोहोचलो आठनेर वरून पुढे पारसडोह येथे पोहोचलो. येथे दादाजी धुणीवाले यांचे भव्य मंदिर आहे. सोबत तापीचा फार मोठा व्याप असलेले विशाल पात्र आणि पाण्याच्या प्रवाहाने त्यात तयार झालेले विवर नजर रोखून ठेवते, काळया पोषणाला पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले हे विवर इतके सुंदर की पाहताक्षणी नजर त्यावर रोखली जाते. हा निसर्गाचा एक अपूर्व चमत्कारच म्हणावा, त्या उन्हाच्या रखरखत्या लाटेत आमचा प्रवास बैतूल च्या वाटेने सुरू झाला आता लवकर आपल्याला खेरला (खेडला) किल्ला गाठायचा इच्छा होती. आणि दुपारी 2 वाजता कडक उन्हात आम्ही किल्ल्याच्या जवळ पोहोचलो 5 तासाची आमची मेहनत फळाला आली होती पुढच्या डोंगरावर असलेला खेडला आम्हाला खुणावत होता, किल्ल्याच्या आत जायला, हा किल्ला मिस्त्रदुर्ग पद्धतीचा आहे, भुईकोट अजूनही शाबूत अवस्थित आहे त्याला बाहेर खंदक पहायला मिळतात, गोमुखी पद्धतीने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेले असता प्राचीन मंदिराचे अवशेष पहायला मिळतात, त्यात सुबक नक्षी असलेले अस्ताव्यस्त पडलेल खांब, गणेशपट्टी असे सर्व.
थोड पुढे गेल्यास शिवाचे पुरातन मंदिर आहे, त्याला नवीन करण्यात आले पण मंदिराच्या बाहेर म्हैशासुर मर्दिनीच्या पुरातन मूर्ती, गणेश मूर्ती, जैन मूर्ती अशा खूप भग्न मूर्ती मंदिर परिसरात पहायला मिळतात, तेथून वर 600 ते 700 मीटर डोंगरी पायरी मार्गाने मुख्य बालेकिल्ल्यात प्रवेश करावा लागतो, पायरिमार्ग अजूनही बराचसा शाबूत आहे, किल्ल्याचे भव्य पराकोट आणि वरून दिसणारा नयनरम्य परिसर मन वेधून घेतो, वर किल्ल्यावर आदिवासी समाजाचे देवीचे मंदिर आहे, बालेकिल्ला सुंदर असून आता फक्त पराकोट शिल्लक राहिले आहे.सध्याच्या मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील खेरला या किल्ल्यातून नरसिंहदेवराय यादव हा गुणी राजा कारभार पाहत होता. इसवी सन १३९७ यावर्षी दिल्लीवर तैमूरलंग ने हल्ला केला व दिल्लीतील जनतेची कत्तल करून तैमूरने मोठी लूट आपल्या बरोबर नेली. यावेळी तैमुरलंग हा सुन्नी पंथाचा आहे तर बहामनी शिया पंथीय म्हणून बहामनी सुलतान फिरोजशहा बहमनीने तैमुरच्या भीतीने आपल्या सर्व सुभेदारांसहित सैनिकांनाही गुलबर्गा येथे बोलावविले. याचा फायदा घेऊन नरसिंहदेव याने संपूर्ण वऱ्हाड मुसलमानांपासून मुक्त केले. त्याच्या दुर्दैवाने नियोजन आणि प्रशासन व्यवस्थेचा अभाव यामुळे लवकरच त्याला वऱ्हाड सोडून द्यावा लागला. याच काळात बहामनीचे सूत्रे अहमदशहा बहामनी या सुलताना कडे गेली व त्यानेच बहामनी ची राजधानी गुलबर्गा येथून बिदर येथे इसवी सन १४२५ या वर्षी आणली. याच वर्षीपासून नरसिंहदेव यादवाच्या भीतीने वऱ्हाडातील अनेक किल्ल्यांची डागडूजी करण्यात आली. गाविलगड किल्ल्यांवर तर या घटनेची शिलालेखात नोंद आहे. बहामनी सत्ताधीश व नरसिंग देवराय यादव यांच्यातील संघर्ष तब्बल 35 वर्षे चालले. शेवटी खेरला येथे नरसिंग देवाचा पराभव झाल्यानंतर बहामनी सुलतानाने त्याला ठार मारले तब्बल 35 वर्ष बहामनींशी संघर्ष करणारा नरसिंहदेवराय यादवाचा इतिहास आजही उपेक्षित आहे हे त्याचे आणि इतिहासाचे दुर्दैवच म्हणावे लागेल
त्या नरसिंह देव यादवांच्या पराक्रमाला, शौर्याला नमन करायला आणि त्यांच्या शौर्याला उजळा देण्याकरिता स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चा हा छोटा सा प्रयत्न.
