डॉ. बाबासाहेब आंबेडकर : राष्ट्रनिष्ठेचा प्रखर आवाज.

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : राष्ट्रनिष्ठेचा प्रखर आवाज.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : राष्ट्रनिष्ठेचा प्रखर आवाज ही केवळ एक गौरवपूर्ण ओळ नाही, तर त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा सार आहे. १४ एप्रिल हा दिवस त्यांच्या जन्माचा असला, तरी तो भारताच्या सामाजिक जागृतीचा, बौद्धिक प्रामाणिकतेचा आणि राष्ट्रनिष्ठ विचारांचा दीपस्तंभ आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर अन्याय, विषमता आणि ढोंगीपणाविरुद्ध संघर्ष केला, पण त्यांचा दृष्टिकोन नेहमीच व्यापक, तर्काधिष्ठित आणि राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवणारा होता.

बाबासाहेब हे प्रखर राष्ट्रभक्त होते. हे त्यांच्या जीवनातील अनेक कृत्यांवरून अनेक प्रसंगावरून आपल्याला दिसून येते. राष्ट्र हे प्रथम येते आणि नंतर सर्व गोष्टी येतात असा संदेश त्यांनी अनेक उदाहरणातून आपल्या समोर ठेवला. राष्ट्र हे छोट्या छोट्या कृतीतून सुद्धा महान होऊ शकते असे त्यांचे मत होते. बाबासाहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोणत्याही एका विचारसरणीला अंतिम सत्य मानले नाही. समाजातील जातिव्यवस्थेवर त्यांनी कठोर प्रहार केला, परंतु त्याच वेळी त्यांनी इस्लाम, कम्युनिझम आणि इतर विचारप्रवाहांचेही सखोल आणि निर्भीड विश्लेषण केले. आणि याच गोष्टी त्यांना प्रखर राष्टभक्त बनवतात. “Pakistan or Partition of India” या ग्रंथात त्यांनी इस्लामचा अभ्यास करताना स्पष्ट केले की इस्लाम हा केवळ वैयक्तिक धर्म नसून एक सर्वसमावेशक सामाजिक-राजकीय व्यवस्था आहे. त्यांच्या शब्दांत, इस्लामची बंधुता ही ‘उम्मा’वर आधारित असून ती राष्ट्रनिष्ठेपेक्षा वेगळी ओळख निर्माण करते. त्यांनी असेही नमूद केले की “इस्लाम एक बंद निगम आहे आणि जो मुसलमान नाही तो बाहेरचा आहे,” आणि ही विचारसरणी राष्ट्रीय एकात्मतेसमोर अडथळा ठरू शकते.

याच संदर्भात त्यांनी ‘दार-उल-इस्लाम’ आणि ‘दार-उल-हर्ब’ या संकल्पनांचे विश्लेषण करत सांगितले की ज्या ठिकाणी इस्लामी सत्ता नाही ती भूमी ‘दार-उल-हर्ब’ मानली जाते, आणि अशा विचारसरणीमुळे राष्ट्रनिष्ठा गुंतागुंतीची बनते. बाबासाहेबांनी हा मुद्दा केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक आणि राजकीय परिणामांच्या दृष्टीने मांडला. अनेक इतिहास तज्ञांचे विश्लेषण आहे की बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताच्या फाळणीला आणि पाकिस्तानच्या निर्मितेला शेवट पर्यंत विरोध राहिलेला आहे. एक प्रकार राष्ट्रभक्त कधीच देशाचे दोन तुकडे होताना बघू शकणार नाही.भारतातील धर्मांतराच्या प्रक्रियेवर भाष्य करताना त्यांनी एक अत्यंत संवेदनशील निरीक्षण नोंदवले धर्मांतर हे अनेक वेळा केवळ श्रद्धेचे परिवर्तन राहत नाही, तर ते सांस्कृतिक तुटणाही निर्माण करते. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की भारतातील काही मुसलमान स्वतःला अरब, इराणी किंवा मध्य आशियाई वंशाशी जोडण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या भारतीय पूर्वजांपासून दुरावतात. यामुळे त्यांच्या भारताशी असलेल्या सांस्कृतिक आणि भावनिक नात्यात अंतर निर्माण होते. त्यांनी विचारलेला प्रश्न आजही तितकाच लागू होतो धर्म बदलता येतो, पण जन्मभूमी, भाषा , संस्कृती आणि इतिहास कसे बदलता येतील?

बाबासाहेबांनी काही धार्मिक स्थळांमधून दिल्या जाणाऱ्या प्रवचनांवरही गंभीर निरीक्षण नोंदवले. त्यांनी नमूद केले की काही ठिकाणी खुतब्यांमधून शासनाविरोधात लढण्याचे आवाहन केले जाते, जे धर्माच्या नावाखाली राष्ट्रविरोधी प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊ शकते. त्यांनी हा मुद्दा मांडताना कोणत्याही व्यक्तीला दोष देण्याचा हेतू ठेवला नव्हता, तर धर्म आणि राजकारण यांचे धोकादायक मिश्रण दाखवण्याचा होता. धर्माची जोड घेऊन राजकारणात आलेली मुस्लिम लीग शेवटी पाकिस्तान तयारच करणार, म्हणून बाबासाहेब धर्म आणि राजकारणाच्या मिश्रणाला विरोध करीत राहिले.खिलाफत चळवळीच्या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्यासाठी नव्हती, तर तुर्कीतील खलिफाच्या सत्तेसाठी होती. त्यांनी नमूद केले की भारतीय मुसलमानांनी भारताच्या राष्ट्रीय हितापेक्षा एका परदेशी सत्तेला अधिक महत्त्व दिले, आणि काही नेत्यांनी अफगाण अमीरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रण देण्याची भूमिकाही घेतली. या घटनांनी त्यांना राष्ट्रनिष्ठेच्या प्रश्नावर सखोल विचार मांडण्यास प्रवृत्त केले. भारतीय मुस्लिम हे भारताचे पहिले आहेत आणि नंतर ते एका विशिष्ट धर्माचे आहेत, धर्म आणि देश निवडतांना देशच सुरवातीला समोर यायला हवा असे आवाहन सुद्धा त्यांनी अनेक आपल्या भाषणा मधे भारतीय मुस्लिमांना केले. आणि या प्रेरणेतून अनेक राष्ट्रीय विचारांचे मुस्लीम नेते सुद्धा तयार झाले.

आजच्या काळातही काही ठिकाणी परदेशातील मुस्लिम राष्ट्रांबाबत तीव्र भावनिक प्रतिक्रिया दिली जाते, तर भारतातील प्रश्नांबाबत तुलनेने कमी भूमिका घेतली जाते, अशी टीका केली जाते. या संदर्भात बाबासाहेबांचे विश्लेषण आठवते. मात्र, हेही तितकेच सत्य आहे की भारतातील मोठा मुस्लिम समाज संविधाननिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ आहे. त्यामुळे हा प्रश्न संपूर्ण समाजाचा नसून काही प्रवृत्तींचा आहे हे संतुलन राखणे आवश्यक आहे.कम्युनिझमविषयी बाबासाहेबांची भूमिका तितकीच स्पष्ट आणि ठाम होती. बाबासाहेब आणि कम्युनिस्ट यांचा संघर्ष हा केवळ वैचारिक नव्हता, तर तो ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचा होता. १९३७ साली त्यांनी स्थापन केलेल्या ‘Independent Labour Party’ ला कम्युनिस्टांनी विरोध केला, कारण त्यांच्या मते वर्गसंघर्ष हा जातिसंघर्षापेक्षा महत्त्वाचा होता. बाबासाहेबांनी हे ठामपणे नाकारले आणि सांगितले की भारतात जात ही वर्गापेक्षा अधिक मूलभूत समस्या आहे.

१९४६ च्या संविधान सभेच्या निवडणुकीतही कम्युनिस्टांनी त्यांच्या उमेदवारांविरोधात प्रचार केला. मुंबईतून त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न झाला, आणि ते बंगालमधून निवडून आले. ‘Annihilation of Caste’ या ग्रंथावरही कम्युनिस्टांनी टीका केली, कारण त्यांना वाटत होते की आर्थिक क्रांती ही अधिक महत्त्वाची आहे. बाबासाहेबांनी याला उत्तर देताना स्पष्ट केले की भारतात जात आणि वर्ग वेगळे करता येत नाहीत जात ही आर्थिक विषमतेचे मूळ कारण आहे. कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांना ही कल्पना आधीच होती की बाबासाहेब आंबेडकर हे देशविरोधी शक्तींना विरोध करणारे आहेत. त्यामुळे त्यांचा संघर्ष हा कायम शेवट पर्यंत राहिला.कम्युनिस्ट पक्षाने भारतीय संविधानालाही ‘बुर्जुआ दस्तावेज’ म्हणून हिणवले, जे भारताचा आणि येथील लोकशाहीचा थेट अवमान होता. तसेच एक राष्ट्रभक्त विचारधारेला वंचितांपर्यंत घेऊन जाणाऱ्या कायदेपंडिताचा सुद्धा अपमानच होता. बाबासाहेबांनी कम्युनिझमला नाकारताना स्पष्ट केले की तो भारतातील जातिव्यवस्था नष्ट करू शकत नाही, कारण जात ही केवळ आर्थिक नव्हे, तर धार्मिक आणि सामाजिक रचना आहे. त्यांनी कम्युनिझममधील हिंसात्मक प्रवृत्तीवरही टीका केली आणि सांगितले की रशियन क्रांतीसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी जीवितहानी झाली.

त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की “आर्थिक समानता आली तरी सामाजिक समानता आपोआप येत नाही,” कारण भारतातील भेद हे आर्थिक नसून सामाजिक आणि धार्मिक स्वरूपाचे आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दलित प्रश्नाकडे अनेकदा दुय्यम दृष्टीने पाहिले, आणि वर्गसंघर्षाच्या नावाखाली जातिसंघर्ष दुर्लक्षित केला. केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये दीर्घकाळ सत्ता असूनही दलित आणि आदिवासींच्या स्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नाही, हा मुद्दाही अनेकदा मांडला जातो.कम्युनिस्टांनी ‘दलित आणि मुसलमान’ एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, परंतु बाबासाहेबांनी स्पष्ट केले की कोणतीही एकता ही केवळ राजकीय समीकरणांवर नव्हे, तर सामाजिक सुधारणा आणि समानतेच्या आधारावर असावी. त्यांनी मुस्लिम समाजातील अशरफ-अजलाफ भेद संपवण्याची गरजही अधोरेखित केली. बाबासाहेबांनी कम्युनिस्ट विचारधारेची नस ओळखलेली होती. प्रत्येक वेगवेगळ्या देशात कम्युनिस्ट आपली एक वेगळी राजनीती वापरत होते. त्यात भारतात कम्युनिस्ट हे उच नीच आणि दलित मुस्लिम ऐक्याची आभासी राजनीती करीत होते.

या सर्व विचारांमधून एक गोष्ट स्पष्ट होते बाबासाहेब हे कोणत्याही एका विचारसरणीचे नव्हते; ते समता, न्याय, तर्क आणि राष्ट्रहिताचे होते. त्यांनी प्रत्येक समाजाला आरसा दाखवला आणि सांगितले की भारताची एकता टिकवायची असेल, तर प्रत्येकाने स्वतःतील दोषांवर मात केली पाहिजे. त्यांनी नेहमीच राष्ट्रविरोधी शक्तींना तीव्र विरोध केला मग ते लाल सलाम करणारे कम्युनिस्ट असो की धर्माची राजनीती करणारे जिहादी मुस्लिम.. त्यांचा विरोध कायम होता. आज एक खरं बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या राष्ट्रप्रेमी भारतीयांना आश्चर्य वाटत असेल जेव्हा जय भीम सारखा पवित्र नारा हा लाल सलाम आणि जय मिम सारख्या विरोधाभास आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांच्या तोंडून घेतो. खरच अश्या कम्युनिस्ट आणि जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी बाबासाहेबांचा इतिहास नीट वाचवा. ज्यांनी देशाचे संविधान नाकारले ज्यांनी बाबासाहेबांचे विचार नाकारले आज तेच लोक फक्त वोट बँक च्या राजकारणासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव चुकीच्या पद्धतीने वापरत आहे. बाबासाहेब हे संपूर्ण राष्ट्राचे आहेत. त्यांचे जीवन या राष्ट्राला समर्पित होते. महामानव हे कोणत्या एका जातीचे राहत नाहीत तर ते संपूर्ण सर्व समाजाचे होतात. परंतु असे महामानव त्यांचे कधीच नसतात जे अश्या थोर महामानवाच्या विचारांचे पाईक होऊ शकत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारतीय समरसतेचे सेतू आणि राष्ट्रनिष्ठेचा प्रखर आवाज होते. त्यांनी समाजाला केवळ विचार दिले नाहीत, तर दिशा दिली. त्यांचा वारसा जपायचा असेल, तर त्यांच्या विचारांचे संपूर्ण, प्रामाणिक आणि निर्भीड आकलन करणे आवश्यक आहे. अश्या थोर महामानवाला त्यांच्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन करतो.

जय भीम | जय भारत | जय संविधान

– ॲड संकेत राव

Leave A Reply

Your email address will not be published.