बिटिंग रिट्रिट : मंत्रमुग्ध करणारा सोहळा !!

0 168

बिटिंग रिट्रिट : मंत्रमुग्ध करणारा सोहळा !!

भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा नुकताच २६ जानेवारी ला पार पडला. या सोहळ्यादरम्यान भारतासह जगभरातील नागरिकांनी देशाच्या जवानांचं शिस्तबद्ध आणि अंगावर शहारे आणणारं राजपथावरील संचलन पाहिलं. प्रजासत्ताक सोहळ्यादरम्यान आणि वाघा बॉर्डरवर दररोज चालणारं ‘बिटिंग रिट्रिट’ म्हणजे राष्ट्र चेतना जागृती करणारे राष्ट्र वैभवच म्हणता येईल. मंत्रमुग्ध करणारी लष्करी धून, ड्रम्स आणि शिस्तबद्ध पद्धतीत लष्करी गणवेशात वेगवेगळे वाद्य वाजवत अनेक प्रकारच्या रचना करणारे लष्कारी बॅण्ड पाहतांना प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरुन नाही आला तर नवलच. दर वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक सोहळ्यास सुरुवात होते आणि त्याची सांगता होते ती २९ जानेवारीच्या या नेत्रदीपक सोहळ्याने आणि जगभरात तो आवर्जून पाहिला ही जातो.

रिट्रिट याचा शब्दशः अर्थ म्हणजे थांबा किंवा मागे परत फिरा.
खरंतरं रिट्रिट हा युद्धातला शब्द. युद्धाच्या काळात सूर्यास्तावेळी आपल्या सैनिकांना युद्ध थांबवण्यासाठी दिला जाणारा संकेत म्हणजे रिट्रिट. बिगुल वाजवून हा संकेत दिला जात असे. पण कालांतराने त्यात बदल होते गेले. असं ही म्हटलं जातं की विलियम्स ३ या इंग्लंडच्या राजाने १९६४ साली असा फर्मान सोडला की, ड्रम्स पथकाच्या मेजरने आणि इतर ड्रम्स वाजवणाऱ्यांनी रेजिमेंटच्या कप्तानला सलामी देत रस्त्यात ड्रम्स वाजवत जावे. आणि इतर रेजिमेंटच्या ड्रमर्सने त्यांना प्रतिसाद म्हणून आपले वाद्य वाजवावे. आणि इथून सुरू झाली या मंत्रमुग्ध प्रवासाची सुरुवात.

भारतात या सोहळ्याची सुरुवात १९५० ला झाली. भारतीय लष्काराचे मेजर रॉबर्ट यांनी एका बॅण्डचं संयोजन केलं होतं. त्यात वेगवेगळ्या लष्करी रेजिमेंट्सचे बॅण्ड, बॅगपायपर, trumpets , ड्रम्स अशा वाद्यांचा समावेश होता. त्याबरोबर नौदल आणि हवाईदलाचे बॅण्ड्स देखील होते. तीनही सेनादलाचे बॅण्ड्स या सोहळ्यात सहभागी झालेले असतात.नॉर्थ ब्लॉक,साऊथ ब्लॉक याच्या मध्ये रायसीना हिल्स आणि त्याच्याखाली विजय चौक . याच चौकात हा सोहळा संपन्न होतो.

या सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रमुख अतीथी म्हणून येतात. या सोहळ्यास परंपरेनुसार राष्ट्रपतींचं आगमन खास बग्गीतून होतं असे. पण आता सुरक्षेच्या दृष्टीने आलिशान गाडीत व राष्ट्रपतींचे विशेष घोडेस्वार अंगरक्षक यांच्या सोबत येथे आगमन होते. राष्ट्रपतींचं स्वागत एका खास ट्रंपेटच्या धुनने केलं जातं आणि त्यांचे विशेष घोडेस्वार अंगरक्षक त्यांना मानाची सलामी देतात त्यानंतर झेंडावंदन होऊन राष्ट्रगीताने सोहळ्यास सुरूवात होते.

सुरूवातीला तिन्ही सेनादलाचे बॅण्ड वेगवेगळ्या लोकप्रिय धून वाजवतात. ‘कदम कदम बढाये जा’ सारखे लोकप्रिय गीत वाजवलं जात व त्याचबरोबर इतर लष्करी,निम लष्करी धून वाजवत वेगवेगळ्या व्यूहरचना सादर केल्या जातात. याने वातावरणात राष्ट्र चैतन्याचा उत्साह संचारतो. अनेक वाद्य वाजवत या सुंदर रचना प्रस्तुत केल्या जातात. त्यात bagpiper, trumpets, drums चा समावेश असतो. या संगीत रचनांनमुळे संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध होत. या सगळ्याचा शेवट होतो तो बिगुल वाजवून. त्याच बरोबर राष्ट्रध्वज सन्मानाने हळुहळू खाली उतरावला जातो. त्यानंतर बॅण्ड मास्टर सोहळा संपवण्याची परवानगी मागण्यास राष्ट्रपतींकडे जातात आणि सोहळा संपल्याची घोषणा होते.

‘सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ वाजवत बॅण्ड पथक निघून जातात. ज्यावेळी ते जात असतात तेव्हा एक वेगळाच जोश आणि काही क्षण वाटतं की आपण नक्कीच नशिबवान आहोत या प्रजासत्ताक राष्ट्रात जन्माला आलो.व त्यांची दमदार चाल ही विलक्षण अशीच आहे. अशा वातावरणात राष्ट्रगीताची धून कानावर पडते आणि सन्मानाने या सोहळ्याची सांगता होते. त्यानंतर संपूर्ण परिसर तिरंगाच्या रोषणाईने लखलखुन जातो.सर्वजण हा क्षण कैद करण्यासाठी तत्पर असतात.आणि त्या नंतर ज्या टाळ्या पडतात त्या तिथेच उपस्थित राहून अनुभवण्यासारख्या आहेत. हा राष्ट्र सोहळा अनुभवण्यासाठी एकदा तरी दिल्ली गाठायची आणि हा मंत्रमुग्ध करणारा सोहळा बिटिंग रिट्रिट याची देही याची डोळा अनुभवावा. दोन वर्षांपूर्वी हे अनुभवलं आणि आज पुन्हा सारं आठवलं. यावर्षी भर पावसात बिटिंग रिट्रिट सोहळा संपन्न झाला. आपल्या सैनिकांची इच्छाशक्ती संपूर्ण जगाने बघितली. जय हिंद..

वंदे मातरम !!

सर्वेश फडणवीस

लेखक सामाजिक कार्यकर्ते असून सामाजिक व धार्मिक विषयाचे अभ्यासक आहेत. sarveshfadnavis.blogspot.com

Leave A Reply

Your email address will not be published.