खऱ्या हुकूमशाहीची उदाहरणे !

0 482

खऱ्या हुकूमशाहीची उदाहरणे !

भारतातील तमाम विरोधी पक्ष, पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी, उदारमतवादी यांच्या मते देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे. गेल्या सात वर्षात भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जबरदस्त संकोच होत आहे. आश्चर्य म्हणजे देशातील पंतप्रधानांना “चोर” वगैरे म्हणत आपली अभिव्यक्ती कोणत्याही निर्बंधा शिवाय व्यक्त करत असतांना हे अभिव्यक्ती संकोच होत असल्याचा आरोप करत आहे, देशात हुकूमशाही सरकार आणि सत्तेत हिटलर असल्याचा आरोप करत आहेत, त्यांच्या मते “डर का मोहोल है” !

या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आणलेल्या समाज माध्यम, डिजिटल मीडिया आणि ओ.टी.टी. यांच्या करता आणलेल्या “माहिती तंत्रज्ञान (सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियमावली २०२१” या नावाने नवीन कायदा आणत आहे. काय आहे या कायद्यात ? तर हा कायदा त्रिस्तरीय तक्रार निवारण व्यवस्था उभारण्याचा आग्रह हा कायदा करत आहे.

१) प्रकाशका कडून स्व नियमन.

२) प्रकाशकांच्या स्व नियंत्रित संस्थे द्वारे स्वनियमन.

३) देखरेख यंत्रणा.

आता या सगळ्यात मुख्य भार प्रकाशकवरच आहे आणि नेमके हेच समाज मध्यम चालवणाऱ्या कंपन्यांना नको आहे. विशेषतः जगभरात वेगवेगळ्या कारणाने वादात राहिलेल्या ट्विटरला हा कायदा जाचक वाटत आहे. “आम्ही म्हणू तीच अभिव्यक्ती आणि आम्ही सांगू तीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यता” या तत्वावर काम करणाऱ्या ट्विटरने या बाबतीत भारत सरकार विरोधात दंड थोपटले आहे. बाकी ट्विटर या कायद्याला विरोध करत असतांना आव असा आणत आहे की भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यता फक्त आणि फक्त समाज माध्यमांमुळे आहे, मात्र आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्यता ही आपल्याला समाज माध्यमांमुळे नाही तर भारतीय संविधानाने दिलेली आहे, सोबत संविधानाने अभिव्यक्तीचा अधिकार जसा दिला आहे तसे काही कर्तव्ये पण सांगितले आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

आता या सगळ्या निमित्याने जागतिक स्तरावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कशी सुरू आहे आणि तत्सम सरकारे यांच्या स्वातंत्र्य विचारला हिंग लावून पण कसे विचारत नाही याची ताजी उदाहरणे बघू.

पहिले उदाहरण आहे पूर्वाश्रमीच्या सोवियत युनियन मधील देशाचे ! सोवियत युनियनच्या विघटनानंतर स्वातंत्र्य मिळालेला, तरी सोवियत व्यवस्था आपल्या देशात कायम ठेवलेल्या बेलारूस या देशाचे. २३ मे २०२१ ला रायने एअरचे विमान जवळपास १७१ प्रवाशांना घेऊन ग्रीसची राजधानी अथेन्स येथून, या विमानाला पोहचायचे होते लिथूनियाची राजधानी व्हीलीयन्स ! आता ग्रीस वरून लिथुनिया येथे जातांना या विमानाला बेलारूस देशाच्या हवाई हद्दीचा वापर करावा लागतो. जेव्हा हे विमान बेलारुसच्या हवाई हद्दीत आले तेव्हा रायने एअरच्या वैमानिकाला बेलारूस एअर ट्राफिक कंट्रोल मधून संदेश मिळाला की तुमच्या विमानात बॉंब आहे आणि तो केव्हाही फुटू शकतो. तेव्हा लवकरात लवकर विमान खाली उतरवा. बरे फक्त असा संदेश आला असे नाही तर विमानाच्या मागावर असलेले  एक मिग २९ पण समोर आले. बेलारूसची हवाई हद्द ओलांडून लिथुनिया मध्ये प्रवेश करणाऱ्या विमानाला या सगळ्यामुळे पुन्हा मागे वळावे लागले आणि विमानाने बेलारूसची राजधानी मिन्स्क मध्ये ! मिन्स्क विमानतळावर सगळ्या प्रवाशांना सुरक्षित विमानाच्या बाहेर काढण्यात आले. त्या नंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली. जवळपास सहा तास तपासणी केल्यावर सगळ्या विमाप्रवाश्यांना पुन्हा पुढील प्रवासासाठी विमानात जाण्यास सांगण्यात आले, वर विमानात कोणताही बॉंब सापडला नाही असे सांगत, खोट्या फोन मुळे झालेल्या त्रासा बद्दल प्रवाश्यांची माफी मागण्यात आली. वर ही सगळी कवायत आणि त्रास फक्त आणि फक्त तुमच्या सुरक्षेसाठी आवश्यक होती अशी मखलाशीपण करण्यात आली. मात्र जेव्हा विमानात प्रवासी बसले तेव्हा असे लक्षात आले की १७१ प्रवासी घेऊन निघालेल्या विमानात आता फक्त १७० प्रवासी चढले आहे. एक प्रवासी मात्र विमानात चढलाच नाही आणि त्याला सोडून हे विमान आपल्या पुढील प्रवासा करता रवाना झाले.

हा प्रवासी होता रोमन प्रोटेसॅव्हीक ! २६ वर्षीय ब्लॉगर ! मूळचा बेलारूसचा पण सध्या लुथियाना येथे आश्रय घेतलेला. काय होता याचा गुन्हा ? तर याचा गुन्हा इतकाच की, बेलारूसचे हुकूमशहा राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंकोव्ह यांच्या राजवटीला त्याचा असलेला विरोध !

अलेक्झांडर लुकाशेंकोव्ह गेल्या सत्तावीस वर्षांपासून बेलारुस येथे सत्तेत आहे. आपली निरंकुश सत्ता कायम राहावी म्हणून लुकाशेंकोव्ह ती सगळी हत्यारे वापरतात जी एक हुकूमशहा वापरतो. असे नाही की लुकाशेंकोव्ह यांच्या विरोधात बेलारुस मधील नागरिक कधी रस्त्यावर उतरले नाही, मात्र लुकाशेंकोव्ह यांनी हे सगळे विरोध प्रचंड दडपशाहीने झुगारून लावले. असे म्हणतात की लुकाशेंकोव्ह यांचे राजकीय गुरु आहे रशियाचे विद्यमान राष्ट्रपती ब्लादिनेर पुतीन ! पुतीन यांच्या सहकार्यानेच लुकाशेंकोव्ह आज पर्यंत सत्तेत आहे. मात्र हे अर्धसत्य आहे. लुकाशेंकोव्ह यांनी आपली सत्ता कायम राहायला सतत जो आपले समर्थन करेल त्याला पाठीशी ठेवले आहे. गेल्या सत्तावीस वर्षात पुतीन सोबत पण त्यांचे अनेकदा खटके उडाले. जेव्हा त्यांनी पुतीन विरोधात आघाडी उघडली तेव्हा त्यांच्या मदतीला आली युरोपियन युनियन, अमेरिका आणि आज जेव्हा लुकाशेंकोव्ह पुतीन सोबत जुवळून घेत आहे तेव्हा विरोधात उभी आहे ती युरोपियन युनियन, अमेरिका ! त्याच मुळे रोमन प्रोटेसॅव्हीक याच्या नाट्यपूर्ण अटकेची हवा करण्यात येत आहे. अर्थात या सगळ्या विरोधाला लुकाशेंकोव्ह भीक घालतील अशी कोणतीही स्थिती सध्या नाही. जो व्यक्ती आपल्या विरोधकाला अटक करण्यासाठी विमान हायजॅक करायची कवायत करतो, पूर्णत्वास नेतो तो या विरोधाला भीक नक्कीच घालणार नाही. बाकी सध्या रोमन प्रोटेसॅव्हीक बेलारूस मधील जेल मध्ये असून त्याच्यावर आता राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल होणार आहे, या गंभीर गुन्ह्या करता शिक्षा काय असेल हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे.

आता ही झाली युरोप मधील गोष्ट तर आता येऊ आशियात. आशियातील महाशक्ती चीन ! चीन मधील साम्यवादी शासन आपल्या विरोधात उठणाऱ्या आवाजा विरोधात एकदम सजग असते आणि अश्या विरोधी आवाजाला किंवा अगदी संशयित विरोधाला लगेच ठेचून काढते. चीनच्या राजकीय इतिहासात असे अनेक ज्ञात आणि अज्ञात प्रकरणे आहेत, त्यात अजून एका प्रकरणाची भर. या प्रकरणात विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे निदान बेलारूस मधील प्रकरणात रोमन प्रोटेसॅव्हीक याने जरी लुथियाना देशात आश्रय घेतला असला तरी त्याचे नागरिकत्व हे बेलारुसचे आहे. मात्र चीनने ज्यांना अटक केली त्यांच्या कडे आहे ऑस्ट्रेलिया देशाचे नागरिकत्व !

ही कथा आहे यांग हेंगजून या चिनी मूळच्या ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तीची. चीनच्या हुबेई राज्यात यांग हेंगजून यांचा गरीब कुटुंबात जन्म झाला. मात्र आपल्या शिक्षणाने आपण ही परिस्थिती बदलू असे त्यांनी स्वप्न बघितले आणि पूर्णत्वास नेले. चिनी परराष्ट्र खात्यात त्यांना काम मिळाले, काही काळ त्यांनी चीनच्या आंतरिक सुरक्षा विभागात पण काम केले. मात्र तेथील एकूण अनुभवावरून त्यांचा चिनी साम्यवादी सरकार विषयी असलेला विश्वास डळमळीत झाला. मग त्यांनी सरकारी नोकरी सोडत खाजगी क्षेत्राची वाट पकडली. २००० साली ते ऑस्ट्रेलियात आले. सिडनी विश्वविद्यालयात पुढील शिक्षण सुरू केले आणि दोन वर्षात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व पण मिळाले. या मोकळ्या वातावरणात यांग हेंगजून यांनी आपले विचार व्यक्त करायला सुरुवात केली. ब्लॉगिंगच्या माध्यमातून ते आपले विचार प्रगट करायला लागले, सहाजिकच चीन मधील साम्यवादी व्यवस्था आणि इतर ठिकाणी असलेली लोकशाही व्यवस्था यावर त्यांचे भाष्य व्हायचे. त्यातूनच त्यांनी चीन मध्ये लोकशाहीची असलेली आवश्यकता अनेकदा अधोरेखित केली. हे सगळे करत असतांना त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात नोकरी मिळाली आणि ते न्यूयॉर्क मध्ये स्थायिक झाले. याच काळात त्यांनी काही गुप्तचर कथांवरील उपन्यास लिहले, ज्यांना अमेरिकेत बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली. यांग हेंगजून यांनी चिनी परराष्ट्र मंत्रालय आणि आंतरिक सुरक्षा विभागात जे काम केले त्याचे प्रतिबिंब साहजिकच कादंबरीत पडले. यांग हेंगजून यांच्या या कादंबरी लिखाणाचा आणि चीन मधील लोकशाहीच्या समर्थनाचा चांगलाच राग चीन सरकारला येत होता. हे सगळे करतांना यांग हेंगजून अधून मधून आपल्या मायदेशाला भेट देत होते, आपल्या जुन्या नोकरीतील मित्रांना भेटत होते हे विशेष.

मात्र १९ जानेवारी २०१९ ला यांग हेंगजून चिनी नववर्ष साजरा करण्यासाठी न्यूयॉर्क वरून चीन मध्ये आले आणि गांझु विमानतळावर उतरले आणि पुढे शंघायला जाणाऱ्या आपल्या विमानाची वाट बघत होते तेव्हा चीन सरकार कडून त्यांना अटक केल्या गेली. आता अटक झाल्यानंतर जवळपास २८ महिन्यांनी त्यांच्यावर चिनी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. चिनी सरकारने ठपका ठेवला आहे विदेशी देशांसाठी हेरगिरी करण्याचा. हा आरोप करतांना कोणत्याही देशाचे नाव घेतले नाहीये. मात्र चीन मध्ये या आरोपा करता अत्यंत कडक शिक्षा आहे. आता  यांग हेंगजून ऑस्ट्रेलियाचे नागरिक असल्यामुळे साहजिकच ऑस्ट्रेलियन सरकार यांग हेंगजून यांना सोडण्याची आणि राजनैतिक मदत करू देण्याची मागणी करत आहे, चीनवर तसा दबाव आणायचा प्रयत्न करत आहे. या मुळे आधीच तणावात असलेले ऑस्ट्रेलिया आणि चीन संबंध अजून जास्त ताणात आले आहे. मात्र चीन अजिबात ऑस्ट्रेलियाला भीक घालत नाहीये. इतकेच नाही तर ज्या न्यायालयात यांग हेंगजून यांच्यावर खटला चालवल्या जात आहे त्या न्यायालयात चीन मधील ऑस्ट्रेलियन राजदूतांना प्रवेश पण करू दिला नाहीये. सोबत चीन निक्षून सांगत आहे की हा आमच्या देशाचा अंतर्गत मामला आहे, त्या मुळे या प्रकरणात कोणत्याही देशाने लुडबुड करू नये. बाकी चीन मध्ये कोणताही विरोधी पक्ष, पत्रकार, संपादक, आंदोलक, उदारमतवादी या विरोधात आवाज उठवण्याची शक्यता नाहीच.

पण समाज माध्यमानाच्या नवीन कायद्याच्या अनुषंगाने भारतावर दबाव आणणारे पश्चिमी देशातील तथाकथित उदारमतवादीपण चीन आणि बेलारुस विरोधात काहीही ठोस कारवाई करू शकणार नाहीत हे पण इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. बाकी भारतातील हुकूमशाही आणि अभिव्यक्तीच्या संकोचाचे रडगाणे गाणाऱ्यांकरता हुकूमशाही नक्की कशी काम करते याची साधी उदाहरणे आहेत. तेव्हा उगाच नसलेल्या हुकूमशाहीचे रडगाणे गाऊन आपल्या हाताने भारतात असलेल्या लोकशाहीचा नरडा दाबू नका इतकीच इच्छा.

लेखक हे सामाजिक, राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत. मोबा- 808724185 https://lavleledive.blogspot.com/?m=1

Leave A Reply

Your email address will not be published.