स्वराज्याची राजकीय आणि कायदेशीर अपरिहार्यता.
स्वराज्याची राजकीय आणि कायदेशीर अपरिहार्यता.
राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांची लष्करी ताकद आणि स्वराज्याचा विस्तार झाला होता. शिवाजी महाराजांच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात सैन्य, असंख्य दुर्ग आणि विस्तृत सागरी प्रदेश होता. परंतु, विधिवत् राज्याभिषेकाशिवाय तेव्हाच्या राज्यशास्त्रीय चौकटीत त्यांचे स्थान एका स्वतंत्र राजाचे न होता तांत्रिकदृष्ट्या ते विजापूरच्या आदिलशाहीचे बंडखोर जहागीरदार किंवा मुघल साम्राज्याचे ‘जमीनदार’ म्हणूनच नमूद केले जात होते. या विसंगतीमुळे स्वराज्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे सार्वभौम राजे म्हणून असणारे महत्त्व अधाेरेखित होणे, अतिशय आवश्यक होते.
अंतर्गत सार्वभौमत्वाची समस्या : राज्याभिषेक न झाल्यामुळे समकालीन मराठा सरदार, जे स्वतःला आदिलशाहीचे किंवा मुघलांचे वतनदार मानत होते, ते शिवाजी महाराजांना आपल्या बरोबरीचेच मानत. त्यांच्या दृष्टीने महाराज हे केवळ एक यशस्वी बंडखोर होते. त्यामुळे त्यांच्याकडून संपूर्ण निष्ठा किंवा सन्मान मिळवण्यासाठी राज्याभिषेक केल्यामुळे महाराजांचे स्थान सर्वसरदारांपेक्षा श्रेष्ठ बनले आणि त्यांना सार्वभौम असा अधिकार प्राप्त झाला.
मुघल वर्चस्वाला आव्हान : समकालीन मुस्लिम सल्तनतींमध्ये अशी धारणा होती की केवळ दिल्लीच्या मुघल बादशहाच्या मंजुरीने किंवा सनदेनेच कोणालाही राज्य करण्याचा अधिकार असू शकतो. मुघल साम्राज्यामध्ये जर एखाद्या मांडलिकाचा किंवा जहागीरदाराचा सुयोग्य वारस नसेल किंवा बादशहाची परवानगी नसेल, तर ते राज्य थेट मुघल साम्राज्यात विलीन म्हणजेच खालसा केले जात असे. शिवाजी महाराजांनी कोणत्याही परकीय बादशहाची परवानगी न घेता, स्वतःला स्वतंत्र घोषित करून या मुघल वर्चस्वाच्या सिद्धांताला थेट आव्हान दिले आणि स्वराज्याचे सार्वभौमत्व प्रस्थापित केले.
आंतरराष्ट्रीय व्यापार आणि करार : ब्रिटिश, पोर्तुगीज आणि डच हे परकीय शिवाजी महाराजांना राजा म्हणून अधिकृत मान्यता देण्यास टाळाटाळ करत होत्या, ज्यामुळे त्यांच्याशी केले जाणारे व्यापारी करार व्यावहारिक दृष्ट्या कमकुवत ठरत असत. राज्याभिषेकानंतर स्वराज्याला मिळालेल्या सार्वभौम मान्यतेमुळे परकीय सत्तांशी केलेले करार समकालीन राजनैतिक व्यवहारांमध्ये अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित असलेला ब्रिटिश वकील हेन्री ऑक्झिंडेन याने स्वराज्यात ब्रिटिश नाणी चालवण्याची केलेली मागणी महाराजांनी तात्काळ नाकारली. ‘होन’ आणि ‘शिवराई’ ही आपली स्वतंत्र नाणी पाडून महाराजांनी आपली आर्थिक आणि राजकीय स्वायत्तता सिद्ध केली होती.
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी : अस्मितेचे प्रतीक.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जरी ६ जून १६७४ या इंग्रजी तारखेला झाला होता; तरी, हा सोहळा साजरा करताना इंग्रजी तारखेनुसार न करता मुहूर्त काढून ‘ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी’ या हिंदू तिथीला अनुसरून केलेला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६७४ मध्ये स्वतंत्र ‘राज्याभिषेक शक’ सुरू करण्यापूर्वी स्वराज्याच्या प्रशासकीय, लष्करी आणि महसुली व्यवहारांमध्ये प्रामुख्याने ‘सुहूर सन’ (शाहूर सन) याअरबी भाषेवर आधारित सौर-हिजरी कालगणनेचा वापर केला जात होता, तर पारंपरिक व धार्मिक कार्यांसाठी ‘शालिवाहन शक’ प्रचलित होता. मुघल किंवा तत्कालीन विजापूर आणि गोवळकोंडा सल्तनतींच्या प्रभावामुळे त्या काळातील सरकारी पत्रांवर आणि दस्तऐवजांवर ‘हिजरी’ किंवा ‘सुहूर’ सनाच्या अरबी महिन्यांचा आणि वर्षांचा अक्षरी उल्लेख आढळतो. यात वर्षांची गणना करताना अलफ (१०००), मया (१००), खमसैन (५०) किंवा अर्बा (४) अशा अरबी शब्दांचा संयोग करून “सुहूर सन अर्बा खमसैन मया अलफ” (सुहूर सन ११/११५४) असे लिहिले जाई, तरपत्रांच्या तारखा दर्शवण्यासाठी अरबी चंद्रबदलाची तारीख दर्शवणारा ‘छ’ हा संकेताक्षर वापरून ‘छ १५ जमादिलावल’ किंवा ‘छ ५ रजब’ अशा मुघल व इस्लामिक धर्तीवरील महिने-तारखांचा अधिकृत वापर केला जात होता. तसेच, ग्रॅगोरियन कॅलेंडर (इंग्रजी तारीख) हे प्रामुख्याने पाश्चात्य संस्कृतीशी जोडलेले आहे.
मात्र, भारताच्या स्वतःच्या समृद्ध परंपरा, प्रगत गणितीय ज्ञान आणि खगोलशास्त्रीय प्रगतीचा इतिहास पंचांग गणनेशी जोडलेला आहे. शिवरायांनी परकीय सत्तांची चिन्हे नाकारून स्वतःची नवी राज्यव्यवस्था निर्माण केली. त्यातच, ही हिंदू पंचांग पद्धती चंद्र आणि सूर्य यांच्या गतीवर आधारित वैज्ञानिक चांद्र-सौर कालगणना पद्धती आहे. त्यामुळे, तिथीने आणि मुहूर्त ठरवून पारंपरिक पद्धतीने केलेला राज्याभिषेक हा केवळ एक धार्मिक अट्टहास नसून त्यामागे हिंदूंच्या पारंपरिक अस्मितेचा आणि कालगणनेचा सखोल विचार आहे.
भौगोलिक, लष्करी रणनीती आणि मान्सूनचे नैसर्गिक कवच.
राज्याभिषेकाची तिथी निवडताना मान्सूनचे आगमन हा एक मोठा धोरणात्मक विचार होता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार ही बातमी संपूर्ण हिंदुस्थानात पसरली होती आणि मुघल सम्राट औरंगजेबासह स्वराज्याचे इतर शत्रू या सोहळ्यात अडथळे आणण्याचा किंवा रायगडावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता होती.
राज्याभिषेकाच्या वेळेचा आणि मान्सूनच्या प्रारंभाचा परस्परसंबंध पाहता, काही इतिहासकारांच्या मते यामध्ये लष्करी सुरक्षिततेचाही विचार असावा. ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा आठवडा विचारपूर्वक निवडला गेला. महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे ‘मृग नक्षत्र’ जेव्हा सुरू होते तेव्हा ते पावसाळ्याच्या अधिकृत आगमनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे, मृग नक्षत्र सुरू होण्याआधी राज्याभिषेक पूर्ण करून महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेचा आणि नैसर्गिक पावसाचा चपखल वापर केला. तथापि, राज्याभिषेकाची तिथी केवळ या कारणासाठीच निश्चित करण्यात आली होती, असा थेट समकालीन पुरावा उपलब्ध नाही.
पावसाळ्याच्या सुरुवातीला रायगड आणि सभोवतालचा सह्याद्रीचा परिसर अत्यंत दुर्गम, निसरडा आणि वाहतुकीसाठी कठीण बनतो. मुसळधार पावसामुळे कोकणातील नद्यांना येणारे पूर आणि डोंगरदऱ्यांमधील चिखल यांमुळे मुघलांचे अफाट सैन्य, त्यांचे घोडेस्वार आणि वजनदार तोफखाना यांना रायगडाच्या दिशेने कूच करणे किंवा गडाला वेढा घालणे कठीण होते आणि यामुळे त्यांच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते. या नैसर्गिक कवचामुळे राज्याभिषेकासाठी जमलेली रयत, वेगवेगळ्या प्रांतांतून आलेले निमंत्रित आणि राजे-रजवाडे कोणत्याही परकीय आक्रमणाच्या भीतीशिवाय या सोहळ्यात निश्चिंतपणे सहभागी होऊ शकले.
कृषी संस्कृती आणि रयतेच्या हिताचे रक्षण.
शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने ‘रयतेचे कल्याणकारी सुराज्य’ होते. कोणताही राजकीय किंवा सामाजिक निर्णय घेताना ते शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनचक्राचा प्रामुख्याने विचार करत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी निवडण्यामागे महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी जोडलेला संवेदनशील आणि व्यावहारिक पैलू होता.
ज्येष्ठ महिन्याचा उत्तरार्ध हा रोहिणी नक्षत्राचा शेवटचा आणि मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येचा काळ असतो. हा काळ संपूर्ण भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो, कारण मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाबरोबरच शेतात पेरण्यांची लगबग सुरू होते.
जर राज्याभिषेकाचा सोहळा आणखी पुढे ढकलला असता आणि तो आषाढ किंवा श्रावणात घेतला असता, तर ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून गडावर यावे लागले असते, ज्यामुळे स्वराज्यातील अन्नधान्य उत्पादनाचे आणि शेतीचे नुकसान झालेअसते. पेरण्या प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच, म्हणजे कडक उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाच्या तोंडावर हा सोहळा झाल्यामुळे रयतेला राज्याभिषेकाचा अभूतपूर्व आनंद घेता आला आणि त्यानंतर शेतीचे काम सुरू झाले.
खगोलशास्त्रीय गणना.
राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीचे प्रकांड पंडित आणि हिंदू धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक पंडित विठ्ठल तथा गागाभट्ट यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी अनेक प्राचीन संस्कृत ग्रंथ आणि स्मृतींचा सखोल अभ्यास करून राज्याभिषेकाचा मुहूर्त निश्चित केला. तत्कालीन ज्योतिषशास्त्राच्या नियमांनुसार, ‘शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी’ हा दिवस मंगलमय मानला गेला.
जेधे शकावलीतील ऐतिहासिक नोंदीनुसार, ज्येष्ठ शुद्ध द्वादशी संपून त्रयोदशी सुरू होण्याच्या संधिकाल रात्रीच्या अंतिम प्रहरात होता. ‘शुक्रवारघटी २१ पले ३४ वी ३८/४० सी ४२, तीन घटिका रात्र उरली असता’ म्हणजेच शनिवार, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी (६ जून १६७४) रोजी पहाटेच्या शुभमुहूर्तावर शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले.
मुहूर्त शास्त्रानुसार, ज्येष्ठ महिन्यात कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राचा कोणताही मोठा मंगलकार्य करण्याचा निषेध सामान्यतः सांगितला जातो. परंतु, ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमधील अपवादात्मक नियमांनुसार, जर काही विशिष्ट ग्रहांची स्थिती उच्च असेल, चंद्र बलवान असेल आणि राष्ट्राच्या अभ्युदयाचा प्रश्न असेल, तर ज्येष्ठ पुत्रासाठी देखील ज्येष्ठ महिन्यात विधी करण्यास अडचण नसते. गागाभट्टांनी या सर्व शास्त्रांची शहानिशा करूनच या तिथीला मंजुरी दिली होती. याची साक्ष आपल्याला त्यांनी लिहिलेल्या ‘राज्याभिषेकप्रयोग’ या ग्रंथात मिळते.
राज्याभिषेकाचा ऐतिहासिक कालक्रम आणि विधींचे आयोजन.
शिवराज्याभिषेक हा केवळ एका दिवसाचा किंवा एका क्षणाचा विधी नव्हता, तर तो जवळपास नऊ ते दहा दिवस चालणारा विस्तृत धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय यज्ञ होता. गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दिवसाच्या विधींचे नियोजन सूक्ष्मपणे केले गेले होते.