नीट परीक्षा घोटाळ्याचा अन्वयार्थ.

नीट परीक्षा घोटाळ्याचा अन्वयार्थ…

सध्या नीट परीक्षेतील पेपरफुट प्रकरण देशभर गाजत आहे. त्यात लातूरच्या प्रसिद्ध लातूर पॅटर्नचे जनक कोचिंग क्लासवाले मोटेगावकर सर यांना पेपर फोडल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. इतरही काही शिकवणी वर्गांचे संचालक अटकेत आहेत, तर काही सीबीआयच्या रडारवर आहेत. या संदर्भात महाराष्ट्रातील कोचिंग क्लास असोसिएशनच्या सदस्यांनी नुकतेच मुंबईच्या आझाद मैदानावर एक आंदोलन केले आणि मोटेगावकऱांनी कोचिंग क्लास चालकांची बदनामी केली असल्याचा आरोप केल्याची बातमी आहे.

या पेपर फूट घोटाळ्यात कोचिंग क्लासवाले बदनाम झाले हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र प्रश्न असा येतो की या कोचिंग क्लास वाल्यांची गरजच का पडावी? आजपासून सुमारे साठ वर्षांपूर्वी शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये जे विद्यार्थी ढ असायचे त्यांनाच शिकवणी लावली जायची किंवा मग कोचिंग क्लासची गरज पडायची. त्यावेळी कोचिंग क्लास हे अगदी तुरळक दिसायचे. आज कोचिंग क्लास हे अगदी कावळ्याच्या छत्र्यांसारखे ठिकठिकाणी उगवलेले दिसतात. या कोचिंग क्लासच्या धंद्यावर प्राध्यापक मंडळी करोडो रुपये कमावतात आणि चैनीत आयुष्य जगतात. त्याच वेळी महाविद्यालये मात्र ओस पडलेली दिसतात. असे का व्हावे याचाही विचार व्हायला हवा.

५०-६० वर्षांपूर्वी शिकवणी किंवा कोचिंग क्लास हे विद्यार्थ्याला पुरवणी ज्ञान म्हणून उपयोगाचे असायचे. त्यावेळी मूळ ज्ञान हे शाळा किंवा महाविद्यालयातूनच दिले जायचे. त्यावेळी शिक्षक किंवा प्राध्यापक मंडळी इमानदारीने शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवायची सुद्धा. आता महाविद्यालये तर नावालाच राहिलेली आहेत. विशेषतः अकरावी बारावीच्या वर्गांमध्ये सर्व वर्ग रिकामे दिसतात. शिक्षक वर्गात जातात आणि परत येतात. स्टाफ रूम मध्ये बसण्याचा ते पगार घेतात असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. तेच प्राध्यापक कोचिंग क्लास मध्ये मात्र जीव तोडून शिकवतात. या कोचिंग क्लास मध्ये परीक्षेत प्रश्न कसे येतील त्यांचा नियमित सरावच करून घेतला जातो. हे काम महाविद्यालयात का केले जाऊ नये याचे उत्तरही प्राध्यापक आणि महाविद्यालय संचालकांनी द्यायला हवे.

पूर्वी दहावी पास झाला की अकरावीत प्रवेश घेण्यासाठी चांगल्या महाविद्यालयांमध्ये रांगा लागायच्या. तिथे विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून त्यांना प्रवेश दिला जायचा. आता तीच परिस्थिती कोचिंग क्लास वाल्याची आहे. ते परसेंटेज पाहून विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. माझ्याच घरासमोर एक प्रतिष्ठित कोचिंग क्लासवाले शिक्षक राहायचे. ज्या दिवशी दहावीचा निकाल लागायचा, त्यादिवशी त्यांच्या घरी विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी होत असे. इतकी की मी गमतीने त्यांना म्हणत असे की, त्या दिवशी तुमच्या घरासमोर स्कूटर आणि कार स्टॅन्ड लावायला मला परवानगी देत चला. एक दिवस चार पैसे तरी कमावता येतील. हे महाशय सुद्धा विद्यार्थ्यांची मार्कलिस्ट पाहूनच प्रवेश देत असत. त्यावरून परिस्थिती लक्षात यावी.

आजपासून अकरा वर्षांपूर्वी माझी मुलगी दहावी मॅट्रिक पास झाली. तिला अकरावी बारावी साठी प्रवेश घ्यायचा तर अनेक पालकांनी आम्हाला सांगितले की, आधी तुम्ही कोचिंग क्लास ठरवा. मग चौकशी केली तर बहुतेक सर्व प्रतिष्ठित कोचिंग क्लासेसमध्ये जागा पूर्ण भरलेल्या होत्या. तिथे त्यांचे शिकवणी शुल्क सुद्धा लाखात असायचे. काही शिकवणी वर्गांमध्ये आम्ही गेलो असता त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्याकडे प्रवेश घ्या, मग एका विशिष्ट कॉलेजमध्ये तुमची ऍडमिशन आम्ही करून देऊ. वर्षभर तुम्ही तिथे गेला नाहीत तरी चालेल. तुम्हाला तिथे उपस्थिती नोंदली जाईल. फक्त प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी आम्हीच विशेष बसने मुलांना तिथे घेऊन जाऊ आणि ते पास होतील हे बघू. म्हणजे किती जुगाडबाजी चालत होती हे लक्षात यावे. आणि या कोचिंग क्लास वाल्यांनी त्यांना कोणतेही सरकारी अनुदान नसतानाही चार चार मजली इमारती बांधून तिथे कोचिंग क्लासेस चालवले असल्याचेही दिसून आले.

याबाबत पालकांशी चर्चा केली तेव्हा आजकाल कॉलेजमध्ये चांगले शिकवत नाहीत म्हणून मुलांना कोचिंग क्लास लावावे लागतात असे उत्तर मिळाले. मुळात कॉलेजमधलेच प्राध्यापक कोचिंग क्लास मध्ये शिकवतात. मग ते कोचिंग क्लास मध्ये जर चांगले शिकवू शकतात, तर कॉलेजमध्ये का शिकवू नये? दुसरे असेही उत्तर मिळाले की कॉलेजमध्ये एका वर्गात शंभर ते सव्वाशे विद्यार्थी असतात त्यामुळे प्राध्यापक प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकत नाही. मग सहजच फेरफटका मारला तेव्हा कित्येक कोचिंग क्लासमध्ये प्राध्यापक चक्क लाऊड स्पीकर लावून विद्यार्थ्यांना शिकवत असलेले दिसून आले. एका वर्गात तिथेही शंभर ते सव्वाशे विद्यार्थी असायचे. मग प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देणे कसे शक्य होणार याचे उत्तर कोणीच देऊ शकत नव्हते.

इथेच खरी गोम आहे. हे कोचिंग क्लासवाले असेच बोर्डात किंवा शिक्षण खात्यात सेटिंग लावून तिथे आधीच पेपर मिळवायचे. नेमके तेच प्रश्न विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे आणि मग ते प्रश्न परीक्षेत आले की विद्यार्थ्यांनी भराभर उत्तरे लिहायची आणि चांगले मार्क मिळवायचे. हे प्रकार आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहेत. त्यातही आता या नीट प्रकरणात अशी ही माहिती येते आहे की काही पालकांनी ते बोगस पेपर मिळवण्यासाठी काही लाखात पैसे मोजले आहेत. अशा पालकांची मुले मग लायकी नसताना देखील गुण मिळवून मेडिकल किंवा इंजीनियरिंग मध्ये जातील आणि बापाच्या पैशाच्या जोरावर इंजिनियर किंवा डॉक्टर होतील. पण असे इंजिनियर किंवा डॉक्टर समाजाला खरी सेवा देऊ शकतील का याचाही विचार व्हायला हवा.

ज्यावेळी दहावी किंवा बारावीचे किंवा मग नीट अशा परीक्षांचे निकाल लागतात, तेव्हा हे कोचिंग क्लासेसवाले आमच्या क्लासमधून या गुणवंत विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, अशा मोठमोठ्या पानभर जाहिराती वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापतात. त्यातले बरेचसे विद्यार्थी असे आधीच त्यांना गेसिंग पुरवलेले असल्यामुळे चांगले मार्क मिळवतात. काही वेळा तर दुसऱ्या एखाद्या क्लास मधून जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला काही पैसे देऊन त्याच्याकडून मी भलत्याच क्लास मधून शिकून असे गुण मिळवले आहेत असे लिहून घेतले जाते, आणि तो आमच्याच क्लासचा विद्यार्थी आहे अशी जाहिरात केली जाते. वाचकांना आठवत असेल तर २००१-२००२ या कालखंडात चाटे कोचिंग क्लासचे असे प्रकरण तत्कालीन शालेय शिक्षण राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी उघडकीस आणले होते. त्यावेळी हे एक प्रकरण उघडकीस आले. मात्र अशी कितीतरी प्रकरणे होत असतील त्याची कुठेही हाक बोंब होत नसेल.

मात्र यामुळे शिक्षण क्षेत्राचा दर्जा किती खालावला आहे हे लक्षात यावे. शिक्षणाने माणूस सुबुद्ध आणि सुजाण होतो म्हणून प्रत्येकाने शिकायला हवे असे आजवर मोठे लोक सांगत आले आहेत. समाजातील तळागाळातील वर्ग शिकून मोठा व्हावा आणि मुख्य प्रवाहात यावा म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून त्यांना आरक्षण द्यायला लावले. मात्र त्याच शिक्षण क्षेत्राचा दर्जा जर इतका रसातळाला गेला असेल तर त्याचा काय तो उपयोग? असे शिक्षण काय कामाचे, याचाही विचार व्हायला हवा. नीट परीक्षा घोटाळ्यातून हाच अन्वयार्थ निघतो…

त्यामुळेच आता समाजातील सुबुद्ध सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन हे शिक्षण क्षेत्र कसे सुधारता येईल यावर चिंतन करायला हवे आणि हे क्षेत्र सुधारण्यासाठी तातडीने आजच पावले उचलायला हवीत. उद्या कदाचित उशीर झालेला असेल.

  • अविनाश पाठक…

competitive examEducation MinisterMPSCNEET ExamUPSC
Comments (0)
Add Comment